श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४ था

आगमोऽपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च ।

ध्यानं मन्त्रोऽथ संस्कारो दशैते गुणहेतवः ॥४॥

गुणवृद्धीचें कारण । आगम म्हणिजे शास्त्र जाण ।

आप म्हणिजे तें जीवन । आवडतें स्थान तो देशू ॥६१॥

ऐक प्रजांचें विंदान । प्रजा म्हणिजे त्रिविध जन ।

जैसी ज्याची संगती जाण । तैसें लक्षण तो पावे ॥६२॥

काळ म्हणिजे दिवसभाग । कर्म म्हणिजे जें जें करी अंग ।

जन्म म्हणिजे दीक्षा सांग । मंत्राचें लिंग यथारुचि ॥६३॥

कर्त्याचा जेथ अत्यादरू । त्या नांव बोलिजे संस्कारू ।

हा दशलक्षणप्रकारू । गुणवृद्धिविचारू तो ऐक ॥६४॥

येथ सत्त्ववृद्धीसी प्रस्तुत । साधकांसी शास्त्र निवृत्त ।

उपनिषद्‍भागेंसीं वेदांत । त्याचा मथितार्थ सेवावा ॥६५॥

आप म्हणिजे जळपवित्रता । गौतमीभागीरथ्यादि पुण्यसरिता ।

ज्यांचा अवचटें शिंतोडा लागतां । पाप सर्वथा उरेना ॥६६॥

कां माझ्या प्रतिमांचें चरणामृत । ज्यालागीं ब्रह्मादिक आर्तभूत ।

किंवा शालिग्रामशिळेचें तीर्थ । सकळ दुरित निवारी ॥६७॥

जेणें सकळ तीर्थें होती पावन । तें ब्राह्मणाचें चरणतीर्थ जाण ।

स्वयें वंदी श्रीनारायण । निजहृदयीं चरण वाहतसे ॥६८॥

भलतैसें हो कां पाणी । जें लागलें सद्‍गुरुचरणीं ।

तें सकळ तीर्थां शिरोमणी । सेवितां तत्क्षणीं उद्धरी ॥६९॥

सत्त्ववृद्धीचें कारण आप । तें इये तीर्थीं जाण पुण्यरूप ।

सेविता सत्त्ववृद्धीचे स्वरूप । आपेआप प्रकाशे ॥७०॥

प्रजा म्हणिजे महाजन । सेवावे साधु सज्जन ।

ज्यांचे संगतीस्तव जाण । उद्धरण जडजीवां ॥७१॥

सत्त्ववृद्धीसी कारण । मुख्यत्वें सत्संगतीचि जाण ।

त्या सत्संगाचें महिमान । केलें निरूपण द्वादशीं ॥७२॥

देशू पूण्यभूमिका सिद्धिस्थळ । विजनवासू एकांतशीळ ।

जेथ बैसतांचि तत्काळ । सत्त्वासी बळ चढोवढीं ॥७३॥

एकांतीं स्थिरावल्या आसन । सहजें वाढे सत्त्वगुण ।

मनीं हव्यासू चढता जाण । वस्तु चिद्‍घन साधावया ॥७४॥

साधकांसी काळ यथोचित । अवश्य ब्राह्ममुहूर्त ।

कां जे काळीं उद्वेगरहित । हर्षयुक्त मन होय ॥७५॥

प्रेमयुक्त अंतःकरणें । जो काळ जाय कथाश्रवणें ।

कां जयंत्यादि महापूजा करणें । जागरणें हरिदिनीं ॥७६॥

थोर काळाची सार्थकता । हरिकीर्तनीं गातां नाचतां ।

त्या काळाचा महिमा तत्त्वतां । माझेन सर्वथा न बोलवे ॥७७॥

निरभिमान कीर्तन करणें । निर्लोभ गाणें नाचणें ।

तो काळू वंदिजे म्यां श्रीकृष्णें । महिमा कोणें बोलावा ॥७८॥

कर्म म्हणिजे तें निवृत्त । जें आशापाशफळरहित ।

कां क्रिया जे उपकारार्थ । सात्त्विक निश्चित तें कर्म ॥७९॥

गुरूपासोनि दीक्षाग्रहण । तें पुरुषासी नवें जन्म जाण ।

गुरु मायबाप संपूर्ण । तें ऐक लक्षण उद्धवा ॥८०॥

उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता ।

जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥८१॥

जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता ।

जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥८२॥

यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां ।

मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥८३॥

ज्याचे देखिलिया चरण । बांधूं न शके भवबंधन ।

तो सद्‍गुरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥८४॥

उपजल्या बाळकासी सर्वथा । वेगळालीं माता पिता ।

एक वीर्यातें निक्षेपिता । धारणपोषणता जननीची ॥८५॥

तैसा सद्‍गुरु नव्हे पिता । निजवीर्य न वेंचितां ।

योनिद्वारें नुपजवितां । जननी जनिता स्वयें झाला ॥८६॥

उदराबाहेरी घातल्यापाठीं । माता पुत्रस्नेहें कळवळा उठी ।

बाहेरिलें सूनि आपुले पोटीं । निजस्नेहें गोमटी गुरुमाता ॥८७॥

यालागीं शिष्यासी तत्त्वतां । सद्‍गुरुचि माता पिता ।

निजस्नेहें वाढविता । तदात्मता अभेदें ॥८८॥

मागील पिते जे चौघेजण । ते याचे सावत्र बाप जाण ।

माता पिता भिन्न भिन्न । सखेपण त्यां कैंचें ॥८९॥

यालागीं सद्‍गुरु जो सकृपू । तो सच्छिष्यासी सखा बापू ।

पित्यापुत्रांमाजीं अल्पू । कांहीं विकल्पू उपजेना ॥९०॥

त्या सद्‍गुरूपासून जाण । शैवीवैष्णवीदीक्षाग्रहण ।

अथवा उपदेशी निर्गुण । चैतन्यघन निजबोधें ॥९१॥

ऐक दीक्षानामाची युक्ती । दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती ।

निःशेष अविद्येची नाशी स्थिती । दीक्षाव्युत्पत्ती त्या नांव ॥९२॥

एवं दीक्षाजन्माची जे कथा । उद्धवा सांगीतली म्यां तत्त्वतां ।

ध्याननिष्ठ जे सात्त्विकता । ऐक आतां सांगेन ॥९३॥

सत्त्वोपाधि शरीर साचें । चैतन्यघन स्वरूप ज्याचें ।

तो श्रीविष्णु ध्येय सात्त्विकांचे । ध्यान त्याचें करावें ॥९४॥

अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवक्त्र ।

ध्यानीं आणावा शंकर । संसारपार तरावया ॥९५॥

या मूर्तींचें ध्यान करितां । हारपे ध्येय ध्यान ध्याता ।

ठसावे चैतन्यघनता । सात्त्विकता हें ध्यान ॥९६॥

जैसी दीक्षा तैसें ध्यान । हें आगमशास्त्रींचे प्रमाण ।

त्या ध्यानाचें पर्यवसान । चैतन्यघन पावावें ॥९७॥

केवळ जें चैतन्यघन । तें सद्‍गुरुस्वरूप जाण ।

त्याचें करावें नित्य ध्यान । अनुसंधान निजनिष्ठा ॥९८॥

पंचभूतदेहाची मूस । तेथ वोतिला ब्रह्मरस ।

गुरुस्वरूप तें सविलास । ध्यान रात्रंदिवस करावें त्याचें ॥९९॥

सात्त्विकांचें जें कां ध्यान । तें हें तूं उद्धवा जाण ।

आतां मंत्रांचें मंत्रग्रहण । तेंही निरूपण अवधारीं ॥१००॥

सकळ मंत्रांची जननी । जे द्विजन्मा करी तत्क्षणीं ।

गायत्रीच्या मंत्रग्रहणीं । ब्राह्मणपणीं अधिकारू ॥१॥

जे सकळ मंत्रांचा राजा । जे वांट्या आली असे द्विजा ।

जिचेनि धाकें द्विजपूजा । मज अधोक्षजा करणें पडे ॥२॥

ते गायत्री स्वभावतां । आली असे ब्राह्मणांच्या हाता ।

तिची उपेक्षा करितां । लौल्यें दरिद्रता पावले ॥३॥

गायत्रीनिष्ठ जो ब्राह्मण । त्याचे मस्तकीं मी वंदीं चरण ।

मंत्रीं गायत्री श्रेष्ठ जाण । वेद प्रमाण ये अर्थीं ॥४॥

गायत्री रिघाल्यावीण कांहीं । इतर मंत्रां रिघमू नाहीं ।

मुख्यत्वें गायत्रीच्या ठायीं । ते लागले पाहीं सकल मंत्र ॥५॥

नव्हतां गायत्रीसंबंध । मुखीं रिघों न शके वेद ।

इतर मंत्रां केवीं संवाद । वेदां वंद्य गायत्री ॥६॥

गायत्रीचें गुह्य परम । चिन्मात्रैक परब्रह्म ।

तो मंत्र ब्राह्मणासीच सुगम । परी तेही वर्म चुकले ॥७॥

एवं गायत्रीमंत्र ब्रह्मपूर्ण । सकळ सिद्धींचें कारण ।

शैववैष्णवमंत्रग्रहण । तेणें त्वरित जाण सत्त्वशुद्धी ॥८॥

सत्त्वशुद्धीचे परिपाटीं । शैववैष्णवमंत्रकोटी ।

तेणें सत्त्वशुद्धी उठाउठीं । होय निजात्मदृष्टी साधकां ॥९॥

मंत्रग्रहणविचार । उद्धवा जाण हा साचार ।

आतां बोलिला जो संस्कार । तोही प्रकार परियेसीं ॥११०॥

मनाचे संकल्पविकल्प । तोडावया अतिसाक्षेप ।

येचि अर्थींचा खटाटोप । महासाटोप जो मांडीं ॥११॥

संकल्पु उठूंचि न लाहे । जेथें उठी तेथें ठेंचित जाये ।

विवेकाचेनि बळें पाहे । मोकळु होये मनाचा ॥१२॥

परमात्मनिष्ठापरवडी । अखंड मनाची मोडी पाडी ।

उसंत घेवों नेदी अर्धघडी । स्मरणनिरवडी मन राखे ॥१३॥

वैराग्यबळें दमी मन । तेणें भेणें करी हरिचिंतन ।

दासी नुल्लंघी स्वामीचें वचन । तैसें स्मरणाधीन मन करी ॥१४॥

इंद्रियें पाहती नाना पदार्थां । मन न पाहे आणिका अर्था ।

जागृतीं स्वप्नीं स्वभावतां । अखंडतां हरि स्मरे ॥१५॥

ऐशा संस्कारें संस्कारिलें मन । निमिषोन्मेषीं हरिचिंतन ।

श्वासोच्छ्वासांचे गमनागमन । सोहंध्यान त्या ठायीं ॥१६॥

स्वाभाविक स्मरणादरु । या नांव आत्मसंस्कारु ।

हा सत्त्ववृद्धीचा प्रकारु । शारङ्गधरु बोलिला ॥१७॥

आत्मशुद्धीचें महाकारण । बोलिलों तें हें दशलक्षण ।

साधकीं सेवावया जाण । विशद निरूपण म्यां केलें ॥१८॥

जेणें खवळला वाढे तमोगुण । तें तमोवृद्धीचें दशलक्षण ।

केवळ त्यागावया जाण । तेंही निरूपण सांगेन ॥१९॥

तेथींचा आगम आभिचारिक । वेदविरुद्ध मार्ग देख ।

वारुणी माध्वी मद्योदक । आवश्यक सेविती ॥१२०॥

जे उभयभ्रष्ट पाखंडी । वेषधारी वृथा मुंडी ।

त्याचें संगतीची अतिगोडी । जेथ अपरवडी विधिवेदां ॥२१॥

द्वेष चोहटा कां परद्वार । तेथेंचि बैसका निरंतर ।

काळ तों त्यासी मध्यरात्र । तैं व्यापार कर्माचा ॥२२॥

क्रियारंभु जारणमारण । मोहन स्तंभन उच्चाटण ।

कां करावें वशीकरण । हें कर्म जाण तामस ॥२३॥

जन्म म्हणिजे दीक्षाग्रहण । प्रेतभूतपिशाचविद्या जाण ।

करितां प्रेतभूतआराधन । प्रेतजन्म जाण तामसां ॥२४॥

जेथ तमोगुण प्रधान । तो क्रोधयुक्त पुरुष जाण ।

सदा शत्रूचें करी ध्यान । करावया हनन उद्यतू ॥२५॥

तामसी मंत्र मुकी मैळी । अथवा उच्छिष्टचांडाळी ।

कां प्रेतदेवता कंकाळी । मंत्रशैली हे तेथें ॥२६॥

संस्कार दगड माती । माझें घर हे माझी क्षिती ।

स्वप्नीं निजेला घाली भिंती । एवढी आसक्ती गृहाची ॥२७॥

घर करावया अशक्त । तरी त्या खिंडोराआंत ।

सदा दगडमाती राखत । नांदतें तेथ येवों नेदी ॥२८॥

देहालागीं गेह करणें घडे । तें देह कष्टवी अतिदुर्वाडें ।

तामससंस्कारें रोकडें । केवळ वेडें गृहासक्तीं ॥२९॥

गृहासक्तीचा व्यापारू । जो मरणान्त न सोडी नरू ।

तो जाण तामस संसारू । त्याचा संस्कारू तो माती ॥१३०॥

जेणें थोरावे तमोगुण । तें हें जाण दशलक्षण ।

ऐक राजसाचें चिन्ह । त्याचें भिन्न स्वरूप ॥३१॥

करावें सत्त्वाच्या अंगीकारा । त्यागावा तमोगुण दुसरा ।

पुढें चाविरा मागें लातिरा । ऐक तिसरा रजोगुण ॥३२॥

हो कां शाहाणी सिंदळी नारी । ते पुरुषाचें मन बरें धरी ।

मग ठकोनि जाय व्यभिचारीं । तैसी परी रजोगुणा ॥३३॥

जैसें कां कुचर घोडें । बरें दिसें परी आडवीं अडे ।

कांहीं केल्या न चले पुढें । मागिलीकडे सरों लागे ॥३४॥

तैसी रजोगुणाची स्थिती । त्यागू न संभवे कल्पांतीं ।

धर्म करितो केवळ स्फीती । मनीं आसक्ती कामाची ॥३५॥

सर्वस्व घ्यावया संवचोरू । सवें धांवे होऊनि नफरू ।

तैसा रजोगुणाचा विचारू । कामनासंसारू वाढवी ॥३६॥

धर्म करी कामासक्ती । केलें भोगवी निश्चितीं ।

पाडी जन्ममरणआवर्तीं । कदा कल्पांतीं सुटेना ॥३७॥

सात्त्विक तरले माझेनि भजनें । तामस तरले मद्विरोधध्यानें ।

राजसाचें जन्ममरणधरणें । रजोगुणें उठीना ॥३८॥

जेणें प्रबळ वाढ रजोगुणा । त्या सांगेन मी दशलक्षणां ।

केवळ त्यागावया काम्यकल्पना । या निरूपणा अवधारीं ॥३९॥

राजसाचें प्रवृत्तिशास्त्र । जें केवळ कामनापर ।

जेणें होय इहामुत्र । तेथें अत्यादर राजसा ॥१४०॥

आप म्हणिजे तें तंव जळ । वेळा वाळा सुपरिमळ ।

कर्पूरयुक्त अतिशीतळ । प्रिय प्रबळ तें राजसा ॥४१॥

प्रजासंगति त्याची ऐक । राजवर्गीं सभानायक ।

व्यवहारीं चतुर अतिरंजक । प्रवृत्तिलोक प्रिय त्यासी ॥४२॥

राजद्वारीं कां सभेमाझारीं । बैसावें पारीं अथवा वेव्हारीं ।

कां मंडपतोरणाभीतरीं । सन्मानें करी उपविष्ट ॥४३॥

वेळु न गमे जैं घरिंच्या घरीं । तैं क्रमी चौहाटा नगरीं ।

कां बैसे बुद्धिबळांवरी । अत्यादरीं सादर ॥४४॥

ऐक रजोगुणाची वेळ । सूर्योदय‍उपरी जो काळ ।

कां राजस जे सांजवेळ । ते ते काळ प्रिय त्यासी ॥४५॥

राजसांचें सकाम कर्म । धनधान्यार्थ करिती धर्म ।

वासना ते पशुपुत्रकाम । स्वप्नीं निष्काम नेणती ॥४६॥

राजसांसी काम गहन । कामासक्ती दीक्षाग्रहण ।

तेंचि त्यांचें जन्म जाण । सदा ध्यान स्त्रियेचें ॥४७॥

मंत्र घ्यावा अभिलाखें । जेणें सन्मान होय लौकिकें ।

ज्याचा सुगरावा थोर देखे । तो मंत्र आवश्यकें आदरी ॥४८॥

संस्कार अतिराजस । शरीरभोगांचे विलास ।

नाना परिमळ बहुवस । उत्तम वास सुधूत ॥४९॥

संस्काराची अंतरनिष्ठा । लौकिकीं व्हावी देहप्रतिष्ठा ।

माझी आज्ञा वंद्य वरिष्ठां । सभेचे चौहाटां मी पूज्य ॥१५०॥

रजोगुण दशलक्षण । उद्धवा त्याची ही वोळखण ।

राजसासी जन्ममरण । सर्वथा जाण सोडीना ॥५१॥

सात्त्विक त्याग करी विवेकनिष्ठें । तामस त्याग करी कडकडाटें ।

राजसासीं त्याग न घडे स्पष्टें । द्रव्यदारालोभिष्टें लोभाळू ॥५२॥

तिहीं गुणांचें लक्षण । म्यां सांगितलें भिन्न भिन्न ।

तिहींचें सर्वसाधारण । सांगेन चिन्ह तें ऐक ॥५३॥