श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

तैरहं पूजितः सम्यक् संस्तुतः परमर्षिभिः ।

प्रत्येयाय स्वकं धाम पश्यतः परमेष्ठिनः ॥४२॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कंधे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥

जरी पूज्यपूजकता गेली । तरी तिंहीं गुरूची पूजा केली ।

सांडूनि द्वैताची भुली । पूजा मांडिली अतिप्रीतीं ॥४३॥

शिष्य झालियाही ब्रह्मसंपन्न । त्याहीवरी त्यासी गुरु पूज्य जाण ।

सद्‍गुरु तोचि ब्रह्म पूर्ण । हे पावली खूण सनकादिकां ॥४४॥

ज्याच्या बोलासरिसेंचि पाहें । अवघें ब्रह्मचि होऊनि ठाये ।

त्या सद्‍गुरूचे पूज्य पायें । सांगूं काये बोलवरी ॥४५॥

ज्यासी परब्रह्म आलें हाता । तोचि जाणे सद्‍गुरूची पूज्यता ।

इतरांसी हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी ॥४६॥

ते सनकादिक समस्त । माझी पूजा करोनि यथोक्त ।

वारंवार स्तवन करीत । चरणा लागत पुनःपुनः ॥४७॥

माझ्या भजनीं एकमुख । माझिया निजभावें अतिभाविक ।

मज अवाप्तकामासी सुख । त्यांचे पूजनीं देख उथळलें ॥४८॥

मग करूनि प्रदक्षिणा । ते लागले माझिया चरणा ।

परम सुख झालें ब्राह्मणां । वचनार्थें जाणा माझेनी ॥४९॥

पहात असतां प्रजापती । सनकादिक उभे असती ।

त्यांदेखतां निजधामाप्रती । शीघ्रगती मी आलों ॥७५०॥

माझे शिष्य सनकादिक । उद्धवा या रीतीं झाले देख ।

तो इतिहास अलोलिक । तुज म्यां सम्यक सांगीतला ॥५१॥

ते योगियांमाजीं अतिउद्‍भट । भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ ।

ज्ञानियांमाजीं अतिवरिष्ठ । शिष्य चोखट सनकादिक ॥५२॥

हंसगीतनिरूपण । पुरातन जें ब्रह्मज्ञान ।

तें उद्धवासी श्रीकृष्ण । प्रसन्न होऊन दीधलें ॥५३॥

भागवतपंथें चालतां । हे पुरातन ब्रह्मकथा ।

एका एकादशू पाहतां । स्वभावें हाता पैं आली ॥५४॥

जीं हंसमुखींचीं चिद्रत्‍नें । जीं सनकादिकां झालीं भूषणें ।

उद्धवा अळंकारिला श्रीकृष्णें । तें शेष जनार्दनें मज दीधलें ॥५५॥

सनकादिक-उद्धवाचें शेष । हाता आलें हा बोल वोस ।

ते गोष्टीसी जाहले बहु दिवस । म्हणाल वायस हा जल्पू ॥५६॥

कृतयुगीं शंखासुरासी । देवें मर्दिलें होतें त्यासी ।

ते ठायीं अद्यापि सभाग्यासी । अव्हाशंखासी पावती ॥५७॥

रामें पूर्वीं अयोध्येसी । केलें होतें महायागासी ।

तेथें हविःशेष लोकांसी । अद्याप हातासी येतसे ॥५८॥

तैसेंचि येथें भागवतीं । जनार्दनकृपापद्धतीं ।

सनकादिकांची शेषप्राप्ती । एकादशार्थीं आम्हां झाली ॥५९॥

मागेंपुढें अवघें एक । हा एकादशाचा विवेक ।

तेणें सनकादिक -उद्धवशेख । आम्हांम्ही देख प्राप्त झालें ॥७६०॥

करूं नेदितां गयावर्जनीं । न रिघवे समर्थजनीं ।

ते पदीं माशीलालागुनी । निवारण कोणी करीना ॥६१॥

तेवीं नाना शास्त्रार्थयुक्तींसी । शिणतां समर्थ साधकांसी ।

प्राप्ती नव्हे ज्ञानशेषासी । ते झाली आम्हांसी एकादशें ॥६२॥

हंसकृष्ण जनार्दन । स्वरूप एक नामें भिन्न ।

तेणें घालूनि बोधांजन । जुना ठेवा जाण दाखविला ॥६३॥

तेथ मी एका एकू देखता । आणि तो एकू मातें दाखविता ।

हेही नुरेचि बोध्यबोधकता । पाहता पाहविता तोचि तो ॥६४॥

आरसा आलिया मुख दिसे । तो गेलिया तें न दिसे ।

परी येणें जाणें मुखासी नसे । ते सहजेंचि असे संचलें ॥६५॥

आरिशाचें मुख आरिसें नेलें । परी पाहातया नाहीं ऐसें झालें ।

जें कटकटा माझें मुख गेलें । तें असे संचलें तो जाणे ॥६६॥

तेवीं अज्ञानें न्यावें । कां ज्ञान झालिया यावें ।

तैसें वस्तूसी न संभवे । तें असे स्वभावें संचलें ॥६७॥

तैसें देखतें आणि दाखवितें । दोनी जाऊनियां तेथें ।

माझें मीपण जें जुनें होतें । तें दाविलें मातें जनार्दनें ॥६८॥

जेवीं सूर्याचेनि प्रकाशें । सूर्येंचि कीं सूर्यो दिसे ।

तेवीं माझेनि निजप्रकाशें । मज मीचि असें देखत ॥६९॥

ऐशियाही ठायीं जाण । कैंचें नवें जुनें ज्ञान ।

बहु काळ ठेविलें सुवर्ण । त्यासी म्हणे कोण कुहजकू ॥७७०॥

कालचाचि आजि उगवला । तो सूर्य काय म्हणावा शिळा ।

कीं आजिचा अग्नि सोंवळा । कालचा काय वोंवळा म्हणों ये ॥७१॥

तेवीं सनकादिकांचें जें ज्ञान । तेंचि मराठीभाषेमाजीं जाण ।

येथें ठेवूं जातां दूषण । दोषी आपण होइजे ॥७२॥

कां सुवर्णाचें केलें सुणें । परी तें मोलें नव्हेचि उणें ।

तेवीं सनकादिकांचीं ज्ञानें । देशभाषा हीनें नव्हतीच ॥७३॥

जेवीं कां गुळाचें कारलें केलें । परी तें कडूपणा नाहीं आलें ।

तेवीं हंसगीत मराठें झालें । नाहीं पालटलें चिन्मात्र ॥७४॥

जें मोल मुकुटींच्या हेमासी । तेंचि मोल सुवर्णश्वानासी ।

जो कां ग्राहिक सुवर्णासी । तो घे दोघांसी समत्वें ॥७५॥

तैसें आत्मानुभवी जे येथें । ते मानितील या ग्रंथातें ।

येर ते हेळसितील यातें । निजभावार्थें न घेती ॥७६॥

जे वंदिती कां निंदिती । ते दोघे आम्हां ब्रह्ममूर्ती ।

हे निजात्मभावाची प्रतीती । केली निश्चितीं जनार्दनें ॥७७॥

एका जनार्दना शरण । रिघतां विरालें एकपण ।

जेवीं कां समरसोनि लवण । स्वयें जाण समुद्र झालें ॥७८॥

तेथे एका आणि जनार्दन । एक झाले हें म्हणे कोण ।

जेवीं डोळ्यांचें देखणेपण । डोळाचि आपण स्वयें जाणे ॥७९॥

डोळ्यांनी आरिसा प्रकाशिजे । तेथें डोळेनि डोळा पाहिजे ।

तेवीं हें ज्ञान जाणिजे । देखणें देखिजे देखणेनी ॥७८०॥

सांडोनियां एकपण । एका जनार्दना शरण ।

हेंचि हंसगीतनिरूपण । झालें परिपूर्ण पूर्णत्वें ॥७८१॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां

श्रीकृष्णोद्धवसंवादे हंसगीतनिरूपणं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ मूळ श्लोक ॥४२॥ ओंव्या ॥७८१॥