श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

॥ श्रीगणेषाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो स्वामी सद्‍गुरू । तूं निजांगें क्षीर सागरू ।

तुझा उगवल्या प्रबोधचंद्रू । आल्हादकरू जीवासी ॥१॥

ज्या चंद्राचे चंद्रकरीं । निबिड अज्ञान अंधारीं ।

त्रिविध ताप दूर करी । हृदयचिदंबरीं उगवोनी ॥२॥

ज्या चंद्राचे चंद्रकिरण । आर्तचकोरांलागीं जाण ।

स्वानंदचंद्रामृतें स्त्रवोन । स्वभावें पूर्ण करिताती ॥३॥

अविद्याअंधारीं अंधबंधे । संकोचलीं जीवदेहकुमुदें ।

तीं ज्याचेनि किरणप्रबोधें । अतिस्वानंदें विकासलीं ॥४॥

जो चंद्र देखतांचि दिठीं । सुख होय जीवाच्या पोटीं ।

अहंसोमकांतखोटी । उठाउठी विरवितू ॥५॥

पूर्णिमा पूर्णत्वें पूर्ण वाढे । देखोनि क्षीराब्धी भरतें चढे ।

गुरुआज्ञामर्यादा न मोडे । स्वानंद चढे अद्वयें ॥६॥

सद्‍गुरु क्षीराब्धी अतिगहन । सादरें करितां निरीक्षण ।

वेदांतलहरीमाजीं जाण । शब्दचिद्रत्‍नें भासती ॥७॥

तेथ विश्वासाचा गिरिवर । वैराग्यवासुकी रविदोर ।

निजधैर्याचे सुरासुर । मंथनतत्पर समसाम्यें ॥८॥

मथनीं प्रथम खळखळाटीं । लयविक्षेप हाळाहळ उठी ।

तें विवेकनीळकंठें कंठीं । निजात्मदृष्टीं गिळिलें ॥९॥

मग अभ्यास प्रत्यगावृत्ती । क्रियेसी झाली विश्रांती ।

प्रकटली रमा निजशांती । जीस श्रीपती वश्य झाला ॥१०॥

तेथ ब्रह्मरस आणि भ्रमरस । इंहीं युक्त अमृतकलश ।

मथनीं निघाला सावकाश । ज्याचा अभिलाष सुरासुरां ॥११॥

ते विभागावयालागुनी । माधवचि झाला मोहिनी ।

अहंराहूचें शिर छेदूनी । अमृतपानी निवविले ॥१२॥

ते वृत्तिरूप मोहिनी । पालटली तत्क्षणीं ।

ठेली नारायण हो‍उनी । पहिलेपणीं उठेना ॥१३॥

ते क्षीरसागरीं नारायण । समाधि शेषशयनीं आपण ।

सुखें सुखावला जाण । अद्यापि शयन केलें असे ॥१४॥

ऐसा सद्‍गुरु चित्सागरु । ज्याचा वेदांसी न कळे पारू ।

नारायणादि नानावतारू । ज्याचेन साचारू उपजती ॥१५॥

ज्याचीं चिद्रत्‍नें गोमटीं । हरिहरांचें कंठीं मुकुटीं ।

बाणलीं शोभती वेदपाठीं । कविवरिष्ठीं वानिलीं ॥१६॥

ऐशिया जी अतिगंभीरा । जनार्दना सुखसागरा ।

अनंतरूपा अपारा । तुझ्या परपारा कोण जाणे ॥१७॥

विवेकें न देखवे दिठीं । वेदां न बोलवे गोठी ।

तेथ हे माझी मराठी । कोणे परिपाटी सरेल ॥१८॥

हो कां राजचक्रवर्तीचे माथां । कोणासी न बैसवे सर्वथा ।

तेथ माशी जाऊनि बैसतां । दुर्गमता तंव नाहीं ॥१९॥

कां राजपत्‍नीचे स्तन । देखावया शके कोण ।

परी निजपुत्र तेथें जाण । बळें स्तनपान करीतसे ॥२०॥

तेवीं माझी हे मराठी । जनार्दनकृपापरिपाटीं ।

निःशब्दाच्या सांगे गोठी । चिन्मात्रीं मिठी घालूनी ॥२१॥

असो आकाश घटा सबाह्य आंतू । तेवीं शब्दामाजीं निःशब्दवस्तू ।

रिता बोल रिघावया प्रांतू । उरला प्रस्तुतू दिसेना ॥२२॥

बाळक बोलों नेणे तत्त्वतां । त्यासी बोलिकें बोलवी पिता ।

तैसीच हेही जाणावी कथा । वाचेचा वक्ता जनार्दन ॥२३॥

त्या जनार्दनाचे कृपादृष्टीं । भागवत सांगों मराठिये गोष्टी ।

जें कां आलोडितां ग्रंथकोटी । अर्थी दृष्टी पडेना ॥२४॥

तेंचि श्रीमहाभागवत । जनार्दनकृपें येथ ।

देशभाषा हंसगीत । ज्ञान सुनिश्चित सांगीतलें ॥२५॥

सद्‍भावें करितां माझी भक्ती । तेणें ज्ञानखड्गाची होय प्राप्ती ।

छेदोनि संसारआसक्ती । सायुज्यमुक्ती मद्‍भक्तां ॥२६॥

माझेनि भजनें मोक्ष पावे । ऐसें बोलिलें जें देवें ।

तें आइकोनियां उद्धवें । विचारू जीवें आदरिला ॥२७॥

देवो सांगे भजनेंचि मुक्ती । आणि ज्ञात्यांची व्युत्पत्ती ।

आणिकें साधनें मोक्षाप्रती । सांगताती आनआनें ॥२८॥

एवं या दोहीं पक्षीं जाण । मोक्षीं श्रेष्ठ साधन कोण ।

तेचि आशंकेचा प्रश्न । उद्धवें आपण मांडिला ॥२९॥