श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३० वा

न तथास्य भवेत् क्लेशो बन्धश्चान्यप्रसङ्गतः ।

योषित्सङ्गाद् यथा पुंसो यथा तत्सङ्गिसङ्गतः ॥ ३० ॥

अविद्येच्या अनंतकोटी । जाण पां स्त्रीसंगाचे पोटीं ।

अधर्माचा भडका उठी । योषिता दृष्टीं देखतां ॥६६॥

जें महामोहाचें मेळवण । जें खवळल्या कामाचे इंधन ।

जें जीवाचें परम मोहन । अधःपतन ते योषिता ॥६७॥

जे मदनाचे तिखट बाण । जें मायेचें चक्र जाण ।

जें अंधतमाचें पूर्ण । भरितें तें जाण योषिता ॥६८॥

हो कां जीचिये संगतीं । आंधळी होय ज्ञानशक्ती ।

जे वाढवी नाना आसक्ती । जिचेनि विस्मृती निजस्वार्था ॥६९॥

जिचेनि संसार बहुवस । जिचेनि असोस गर्भवास ।

जिचेनि विषयविलास । जे वज्रपाश जीवाचा ॥३७०॥

जे अखंड सोशी दुःखशोक । जे सदा सोशी नरकवोक ।

ते माता अनाप्त करूनि देख । स्त्री आवश्यक आप्त होय ॥७१॥

जे मातृस्नेहातें तोडवी । जे बंधुस्नेहातें बिघडवी ।

जे सदा गोंवी हावभावीं । अधर्म‍अटवीं जे पाडी ॥७२॥

जिचे कटाक्ष अतितिख । जिव्हारीं रुतले देख ।

जे जीवाची व्यामोहक । जिचें चढलें विख उतरेना ॥७३॥

एवढी बाधा जाण स्त्रीसंगती । जो वांछूं पाहे माझी प्राप्ती ।

तेणें सांडावी स्त्रियेची आसक्ती । हृदयीं प्रीती न राखावी ॥७४॥

स्त्री आठवतांचि चित्ता । उच्छेदी ज्ञानध्यान अवस्था ।

एवढी स्त्रीसंगबाधकता । त्याहूनि अधिकता स्त्रैणसंगें ॥७५॥

स्त्रीसंगाच्या मोहमदा । सुटका आहे यदाकदा ।

परी स्त्रैणसंगतीची बाधा । ते आपदा अनिवार ॥७६॥

चूडाला स्त्रियेचें संगतीं । तरला शिखिध्वज भूपती ।

नातरी मदालसेचे संगतीं । तरला नृपती कुवलयाश्चु ॥७७॥

हो कां लीलेनें करोनि भक्ती । प्रसन्न केली सरस्वती ।

तिचा उद्धरिला निजपती । हें बोलिलें ग्रंथीं वसिष्ठें ॥७८॥

यापरी स्त्रीसंगतीं । उद्धरले ऐकिजेती ।

परी स्त्रैणाचे संगतीं । उद्धारा गती असेना ॥७९॥

जो कां स्त्रियेचा अंकिला । जो स्त्रियेसी जीवें विकिला ।

जो स्त्रियेचा पोसणा झाला । तिचे बोलामाजीं वर्ते ॥३८०॥

जैशी कुलदेवता खेचरी । तैसें स्त्रियेसी पूज्य करी ।

मग तिचेचि सेवेवरी । नाना उपचारीं नाचत ॥८१॥

पाळिल्या श्वानाचे परिपाटीं । लाविल्या लागे सुहृदापाठीं ।

त्या हडकिलिया शेवटीं । कामथाळोरां पुसाटी घालूनि पडे ॥८२॥

धड गोड उत्तम पदार्था । आपण भोगीना सर्वथा ।

तें देऊन स्त्रियेच्या हाता । आपुली सत्ता निवर्तवी ॥८३॥

इसी जैं विरुद्ध वाटेल । तैं हें ब्रह्मांड पालथेल ।

इचा उल्लंघितां बोल । क्षीराब्धि सुकेल सुखाचा ॥८४॥

नाहीं देवोकुळदेवां पूजणें । मायबापांतें वंचणें ।

शेखीं गुरूतेंही ठकणें । परी सर्वस्व देणें स्त्रियेसी ॥८५॥

एवं माकड जैसें गारुड्याचें । तैसा स्त्रियेचेनि छंदें नाचे ।

ऐशिया स्त्रैणाचे संगतीचें । तेथें सुख कैंचें साधका ॥८६॥

ज्याच्या ऐकतां स्त्रियेच्या गोठी । सज्ञानासही काम उठी ।

जो लावी योषितापाठीं । उठाउठी सकामत्वें ॥८७॥

ऐशिया स्त्रैणाचे संगतीं । कैंची साधकां सुखप्राप्ती ।

तो घालील अधोगतीं । अंधतमाप्रती नेईल ॥८८॥

यालागीं स्त्रैणाची कथा । कानीं नायकावी वार्ता ।

त्याचा वाराही लागतां । तेथूनि सर्वथा पळावें ॥८९॥

त्याची न घ्यावी भेटी । त्यासी न करावी गोठी ।

तो न पहावा दिठीं । न लागावें पाठीं स्त्रैणाचिये ॥३९०॥

स्त्रैण पुढें वाटे जाय । त्याच्या मार्गीं मागू उरला राहे ।

तेही आपण चुकवावी भोये । येथवरी पाहें त्यागावा ॥९१॥

स्त्री आणि स्त्रैणाचे संगतीं । जैसी होय दुःख प्राप्ती ।

तैसे दुःख त्रिजगती । माजीं निश्चितीं असेना ॥९२॥

अत्यंत स्त्रीकामी वशता । ती नांव मुख्य स्त्रैणता ।

केवळ स्त्रियेची अधीनता । तो बाधू परमार्था अतिनिंद्यत्वें ॥९३॥

आपुले हृदयींची कामासक्ती । तेचि स्त्रीसंगाची दृढ प्राप्ती ।

तेथ उपजलिया विरक्ती । मग स्त्रियेची प्राप्ती कोण पुसे ॥९४॥

ऐसें हृदयींचे कणवे । उद्धवासी सांगीतले देवें ।

हें ऐकोनियां उद्धवें । विचारु जीवें आदरिला ॥९५॥

अनिवार उपजे विरक्ती । जेणें बाधीना विषयासक्ती ।

ऐशी जे ध्यानस्थिती । तेचि देवाप्रती पुसत ॥९६॥

जें लागलिया ध्यान । न दिसे स्त्रीपुरुषभान ।

जीवीं उपजे चित्समाधान । तैसें विधान पुसत ॥९७॥