श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ व ९ वा

त्रिकालज्ञत्वमद्वन्द्वं परचित्ताद्यभिज्ञता ।

अग्न्यर्काम्बुविषादीनां प्रतिष्टम्भोऽपराजयः ॥८॥

एताश्चोद्देशतः प्रोक्ता योगधारणसिद्धयः ।

यया धारणया या स्याद्यथा वा स्यान्निबोध मे ॥९॥

क्षुद्रसिद्धी पंचलक्षण । भूत भविष्य वर्तमान ।

या त्रिकाळांचें जें ज्ञान । तें पहिलें जाण ये ठायीं ॥६०॥

सुख दुःख शीत उष्ण । मृदु आणि अतिकठिण ।

या द्वंद्वांसी वश नव्हे जाण । तें दुसरें लक्षण सिद्धीचें ॥६१॥

पराचें स्वप्न स्वयें सांगणें । पुढिलाचे चित्तींचें जाणणें ।

हे तिसरी सिद्धी म्हणणें । ऐक लक्षणें चौथीचीं ॥६२॥

अग्नि वायु आणि उदक । शस्त्र विष आणि अर्क ।

यांचें प्रतिस्तंभन देख । ते सिद्धी निष्टंक पैं चौथी ॥६३॥

कोणासी जिंकिला न वचे पाहें । जेथींचा तेथ विजयी होये ।

एकला सर्वत्र विजयो लाहे । हे पांचवी आहे विजयसिद्धी ॥६४॥

उद्देश्यमात्रें सिद्धींची गती । म्यां सांगीतली तुजप्रती ।

आतां कोण धारणा कोण स्थिती । सिद्धीची प्राप्ती होय ते ऐक ॥६५॥

अष्ट महासिद्धींची धारणा । गुणहेतु दहा सिद्धी जाणा ।

क्षुद्रसिद्धी पंचलक्षणा । त्यांचे साधित्या साधना हरि बोले ॥६६॥