श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

गुणिनामप्यहं सूत्रं महतां च महानहम् ।

सूक्ष्माणामप्यहं जीवो दुर्जयानामहं मनः ॥११॥

गुणी म्हणावया हेंचि कारण । ज्या मजमाजीं सूत्र क्रियाप्रधान ।

मायेचें प्रथमकार्य जाण । तो गुणी मी संपूर्ण उद्धवा ॥६५॥

जगी आकाश थोर पाहीं । तें मजमाजीं खेळे लपंडायी ।

माझ्या महत्तत्त्वाची नवायी । मजही निश्चयीं नेमेना ॥६६॥

महत्तत्त्व जे ज्ञानप्रधान । तें मी म्हणे नारायण ।

सूक्ष्मामाजीं जीवूं आपण । ब्रह्मादिकां जाण अतर्क्य ॥६७॥

दुर्जयांमाजीं मी मन । त्यासी जिंकावया जाण ।

मजवेगळी आंगवण । नाहीं संपूर्ण आणिकासी ॥६८॥

मज लक्षितां मन आकळे । मज विसरतां चौताळे ।

मन न धरवे वेदशास्त्रबळें । मन नाकडे मजवीण ॥६९॥

मन तेंचि मी आहें । मज चिंतितां तें विरोनि जाये ।

मज विसरतां तें पाहें । सैरा जाये सुनाट ॥१७०॥