श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २८ वा

अहं युगानां च कृतं धीराणां देवलोऽसितः ।

द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्य आत्मवान् ॥२८॥

युगांमाजीं कृतयुग । तें मी म्हणे श्रीरंग ।

जेथ संपूर्ण धर्म सांग । अधर्मभाग असेना ॥२२॥

निजधैर्य अतिअद्‍भुत । असित देवल धैर्यवंत ।

तो मी म्हणे गा अच्युत । जाण निश्चित उद्धवां ॥२३॥

वेदविभागी राजहंस । जो कां द्वैपायन व्यास ।

तो मी म्हणे हृषीकेश । निवडूनि द्विजांस दीधले वेद ॥२४॥

कवि त्यांमाजीं परमार्थज्ञाता । उशना कवी जाण तत्त्वतां ।

तो मी म्हणे रमाभर्ता । निजात्मकविता मी शुक्र ॥२५॥