श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

व्यवसायिनामहं लक्ष्मीः कितवानां छलग्रहः ।

तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥३१॥

व्यवसायाचे व्यवस्थिती । दानयुक्त अतिसंपत्ती ।

ते लक्ष्मी मी म्हणे श्रीपती । जाण निश्चिती उद्धवा ॥३८॥

कपटाचिये कपटगती । अगम्य जे छळणस्थिती ।

तो मी कृष्ण मायिकमूर्ती । अतर्क्य युक्ती छळणाची ॥३९॥

ब्रह्माचे अंगी निजजीविता । जीवासी ब्रह्मसायुज्यता ।

त्या कपटाचा मीचि कर्ता । देवांदेवतां अतर्क्य ॥२४०॥

आम्ही मायानियंते म्हणविती । तो शिवू ठकिला मोहिनीप्रती ।

ब्रह्मा ठकिला वत्सहरणार्थी । ठकडा निश्चितीं मी एकू ॥४१॥

सहनशीळीं सहनशक्ती । ते मी म्हणे कमळापती ।

सात्त्विकांची निजसत्त्ववृत्ती । ते मी श्रीपती स्वयें म्हणे ॥४२॥