श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १ ला

उद्धव उवाच-

यस्त्वयाभिहितः पूर्वं धमस्त्वद्‍भत्तिलक्षणः ।

वर्णाश्रमाचारवतां सर्वेषां द्विपदामपि ॥१॥

उद्धव म्हणे गा भक्तपती । ऐकतां तुझ्या निजविभूति ।

मज ऐसें गमलें चित्तीं । स्वधर्मेंसीं भक्ती घडे कैसी ॥१९॥

तुवां कल्पादि वाडेंकोडें । स्वधर्मकर्में भक्ति जोडे ।

हें वर्णाश्रमनिजनिवाडें । निरूपण चोखडें निरूपिलें ॥२०॥

सर्वां मानवां परम गति । स्वधर्में घडे भगवद्‍भक्ति ।

या निरूपणाची निगुती । तुवां निश्चितीं निरूपिली ॥२१॥