श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा

पुरा किल महाबाहो धर्मं परमकं प्रभो ।

यत्तेन हंसरूपेण ब्रह्मणेऽभ्यात्थ माधव ॥३॥

ज्याच्या बाहूचा प्रताप अद्‍भुत । विश्वमर्यादा धर्मसेत ।

राखों जाणे यथास्थित । त्यालागीं म्हणिपत `महाबाहो' ॥२५॥

स्वधर्मकर्माचा द्योतकु । अनादि वक्ता तूं एकु ।

वर्णाश्रमादि विवेकु । उपदेशकु तूं स्त्रष्ट्याचा ॥२६॥

पूर्वीं हंसरूपें सविस्तर । बोलिलासी स्वधर्माचा निर्धार ।

त्यांतील तुवां अध्यात्मसार । निवडूनि साचार मज सांगितलें ॥२७॥

तेथील स्वधर्माचें लक्षण । मज न कळेचि निरूपण ।

जें तूं हंसरूपे आपण । स्वधर्म जाण बोलिलासी ॥२८॥

तुझेनि मुखें यथोचितें । भक्तियुक्त आश्रमधर्मातें ।

सनत्कुमार जाहले श्रोते । तेंचि मातें सांगावें ॥२९॥

म्हणसी `सनत्कुमारद्वारा । धर्म विस्तारला परंपरा ।

तो विचारूनि करीं निर्धारा' । हें सारंगधरा घडेना ॥३०॥