श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ वा

श्रीशुक‍उवाच-

इत्थं स्वभृत्यमुख्येन पृष्टः स भगवान् हरिः ।

प्रीतः क्षेमाय मर्त्यानां धर्मानाह सनातनान् ॥८॥

शुक्र म्हणे गा परीक्षिती । सावधान होईं चित्तीं ।

धन्य उद्धवाची प्रश्नोक्ती । स्वधर्मे मुक्ती पुशिली ॥५०॥

जो भृत्यांमाजीं पढियंता । अत्यंत आवडे कृष्णनाथा ।

त्या वेगळें श्रीअनंता । क्षणही सर्वथा करमेना ॥५१॥

ज्यापाशीं गा निजगुज । सदा सांगे गरुडध्वज ।

ज्यावेगळें आप्तकाज । अधोक्षज बोलेना ॥५२॥

ज्याच्या वचनासी विलंबु । क्षण न करीच रमावल्लभु ।

जो ब्रह्मादिकां दुर्लभु । तो जाहला सुलभु उद्धवा ॥५३॥

यालागीं `भृत्यमुख्यात' । आली उद्धवाचे हाता ।

तेणें प्रार्थूनियां भगवंता । `स्वकर्में मुक्तता' पुशिली ॥५४॥

हो कां ज्याचेनि प्रश्नधर्मे । जग उद्धरिलें यथानुक्रमें ।

ज्यालागीं गा पुरुषोत्तमें । मोक्ष स्वधर्मे प्रकटिजे ॥५५॥

स्वधर्म करितां स्वभावतां । निजमोक्ष लाभे आयिता ।

एवढ्या उपकाराची कथा । उद्धवें तत्त्वतां पुशिली ॥५३॥

ऐकोनि चातकांचे वचन । गर्जोनि वर्षे जेवीं घन ।

कां वत्सहुंकारें जाण । ये हुंबरेन धेनु जैशी ॥५७॥

तेवीं ऐकोनि उद्धवाच्या बोला । श्रीकृष्ण निजबोधें गर्जिन्नला ।

अतिस्वानंदें संतोषला । काय बोलिला गोविंदु ॥५८॥