श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

तेजो बलं धृतिः शौर्यं तितिक्षौदार्यमुद्यमः ।

स्थैर्यं ब्रह्मण्यतैश्वर्यं क्षत्रप्रकृतयस्त्विमाः ॥१७॥

ब्राह्मणप्रकृति दश लक्षण । तुज म्यां सांगितली सुलक्षण ।

आतां क्षात्रवृत्तीचे दश गुण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥३६॥

`तेज' म्हणजे प्रतापशक्ती । जैसा क्षितितळींचा गभस्ती ।

ज्याचिया प्रतापदीप्तीं । लोपले जाती महींद्र ॥३७॥

क्षात्रधर्मी प्रथम काज । तया नांव जाण `तेज' ।

आतां क्षात्रबळाची वोज । ऐक चोज सांगेन ॥३८॥

ज्याच्या शरीरबळाचें कोड । एकला लक्षावरी दे झड ।

जरी तुटला दुधड । तरी वैरियांचे तोंड विभांडी ॥३९॥

रिघतां रणामाझारीं । दुजयाचें साह्य न विचारी ।

जेवीं वनगजीं केसरी । तेवीं रिघोनि दळभारीं विभांडी वीर ॥१४०॥

आकाश दाटल्या निशाचरीं । भूमंडळ कोंदल्या असुरीं ।

ऐसे प्रबळ बळें आल्या वैरी । ज्याचे धृतीमाझारीं विस्मयो नुठी ॥४१॥

आकाश पडावया गडाडी । पृथ्वी उलथावया हडबडी ।

तरी ज्याचे धृतीची रोकडी । नव्हे वांकुडी रोमावळी ॥४२॥

वोडवलियाही कल्पांता । धाक रिघों नेणे ज्याच्या चित्ता ।

ऐसें निजधैर्य स्वभावतां । `धृति' तत्त्वतां ती नांव ॥४३॥

चौर्‍याशीं दंडायुधें धरूं जाणती । शस्त्रास्त्र-धारणाशक्ती ।

स्वधर्में आवश्यकें करिती । या नांव `धृति' क्षत्रियांची ॥४४॥

शूरांचें शौर्य तें कैसें । शत्रूंचें निःशेष नांवचि पुसे ।

वैरी कोणी कोठेंचि नसे । करणें ऐसें तें शौर्य ॥४५॥

धर्मयुद्धाची शौर्यवृत्ती । जेणें विजयश्री चढे हातीं ।

दुश्चित्त निःशस्त्री न हाणिती । पळतया न मारिती महाशूर ॥४६॥

संमुख आलिया रणांगणीं । मागें पावो न ठेवीं रणीं ।

एकला विभांडी वीरक्षोणी । हे स्वधर्मकरणी निजशौर्यें ॥४७॥

मृत्यूएवढा महावैरी । जो निःशेष नाहीं करी ।

त्याच्या शौर्याची थोरी । सुरासुरी वानिजे ॥४८॥

एवं निजशौर्यनिर्धारा । निर्वैर करणें धरा ।

हा चौथा गुण खरा । जाण क्षात्रद्वारा क्षत्रियांचा ॥४९॥

शस्त्रांचे घाय वाजतां माथां । कां सपिच्छ बाण खडतरतां ।

रणांगणीं न सरे मागुता । हे `सहिष्णुता' क्षत्रियाची ॥१५०॥

आलिया गजदळाचे थाट । महावीरांचे घडघडाट ।

तो यावा साहे सुभट । `सहिष्णुता' चोखट ती नांव ॥५१॥

समुद्रलहरींच्या संपाता । कुलाचल न सरे परता ।

तेवीं परसैन्याच्या आघाता । न सरे मागुता रणांगणीं ॥५२॥

तेथ यश‍अपयशांची व्यथा । हर्षशोकविषमता ।

बाधीना क्षत्रियांच्या चित्ता । सर्वसहिष्णुता या नांव ॥५३॥

या नांव ` तितिक्षा ' जाण । हें क्षत्रियांचें पांचवे लक्षण ।

ऐक औदार्याचा गुण । दातेपण क्षत्रियांचें ॥५४॥

क्षत्रियांचे प्रकृतीस जाण । द्रव्य तें तृणसमान ।

याचकांचें निवे मन । तंव देणें दान सर्वस्व ॥५५॥

देश काल सत्पात्र स्थान । तेथही देऊनि सन्मान ।

निर्विकल्पभावें गहन । देणें दान विध्युक्त ॥५६॥

चंद्र चकोरातें पाहीं । सदा देतां नुबगे कंहीं ।

तेवीं हा याचकाचे ठायीं । पराङ्‍मुखता नाहीं क्षत्रियासी ॥५७॥

ऐसें स्वाभाविक जें दान । हा क्षत्रियांचा प्रकृतिगुण ।

या नांव गा `उदारपण' । सहावें लक्षण क्षत्रियांचें ॥५८॥

परमार्थप्राप्तीउपायीं । स्वधर्मनिष्ठा क्षत्रियांठायीं ।

जो जो व्यवसावो करणें कांहीं । तो `उद्यम' पाहीं बोलिजे ॥५९॥

वेंचूनियां निजप्राण । गोब्राह्मणांचे संरक्षण ।

स्वधर्में प्रजापालन । प्रथ्वीरक्षण निरुपद्रव ॥१६०॥

या नांव गा `उद्यम' जाण । क्षत्रियांचे सातवें लक्षण ।

आतां स्वधर्मस्थैर्यगुण । तेहीं निरूपण अवधारीं ॥६१॥

गोब्राह्मणसंरक्षणता । स्वधर्मी प्रजापतिपाळता ।

ये ठायीं उबगु न ये चित्ता । या नांव `स्थिरता' क्षत्रियांची ॥६२॥

स्वधर्मीं जे स्थिरता । तें आठवें लक्षण तत्त्वतां ।

ब्राह्मणभक्तीची जे कथा । ऐक आतां सांगेन ॥६३॥

परमार्थप्राप्तीचें कारण । क्षत्रियासी मुख्यत्वें गुरु ब्राह्मण ।

त्या ब्राह्मणाचें ब्रह्मभावें भजन । सर्वस्वें जाण करावें ॥६४॥

ब्राह्मभावें ब्राह्मणभजन । विधियुक्त देवोनि सन्मान ।

अनुदिनीं ब्राह्मणपूजन । सद्‍भावें जाण जो करी ॥६५॥

जो मद्‍भावें ब्राह्मणपूजा । सन्मानें सुखी करी द्विजा ।

उद्धवा तो आत्मा माझा । तेणें मज अधोक्षजा पूजिलें ॥६६॥

क्षत्रिय सन्मानें द्विज पूजिती । तेणें त्यांसी ऐश्वर्यप्राप्ती ।

ब्राह्मण ब्राह्मणां द्वेषिती । तेणें ते पावती दरिद्रदुःख ॥६७॥

ऐसें करितां ब्राह्मणभजन । मी परब्रह्म होय त्या अधीन ।

त्याच्या ऐश्वर्याचें चिन्ह । दहावें लक्षण तें ऐक ॥६८॥

न करितां ब्राह्मणभजन । अंगीं ऐश्वर्य न ये जाण ।

मी जाहलों षडगुणैश्वर्यसंपन्न । सदा द्विजचरण हृदयीं दृढ वाहतां ॥६९॥

ब्राह्मणभजनमार्गें । ब्रह्मसुख पायां लागे ।

ब्रह्मसायुज्य घर रिघे । तरी भक्त नेघे द्विजभजनें ॥१७०॥

ब्राह्मणभजनें स्वभावतां । माझी सत्ता ये त्याच्या हाता ।

तेव्हां त्याची आज्ञा वंदिती माथां । जाण तत्त्वतां सुरासुर ॥७१॥

त्याचे आज्ञेभेण । पडों न शके अवर्षण ।

न्यायतां प्रजापालन । धर्मसंरक्षण त्याचेनी ॥७२॥

येणेंच स्वधर्में अतिचोख । भरत पुरूरवा जनकादिक ।

महाऐश्वर्य पावले देख । अलोकिक द्विजभजनें ॥७३॥

एवं क्षत्रियांचें दशलक्षण । तुज म्यां केलें निरूपण ।

यांत मुख्यत्वें ब्राह्मणभजन श्रेयस्कर सर्वांसी ॥७४॥

वैश्याचे प्रकृतीस जाण । स्वाभाविक पंचलक्षण ।

ऐक त्याचेंही निरूपण । आचरण यथार्थे ॥७५॥