श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १८ वा

आस्तिक्यं दाननिष्ठा च अदम्भो ब्रह्मसेवनम् ।

अतुष्टिरर्थोपचयैर्वैश्यप्रकृतयस्त्विमाः ॥१८॥

वैश्याचे प्रकृतीसी जाण । अर्थतृष्णा अतिगहन ।

जाहलिया कोट्यानुकोटी धन । तृष्णा परिपूर्ण हों नेणे ॥७६॥

`आस्तिक्य' अर्थसंचयासी । द्वीपींहूनि द्वीपांतरासी ।

नाना वस्तु ने विश्वासेंसी । साधावया अर्थासी भावार्थी ॥७७॥

कां वेदशास्त्रीं अतिविश्वासी । हें मुख्यत्वें `आस्तिक्य' वैश्यासी ।

वेदें लिहिल्या स्वधर्मासी । नव्हे उदासी अणुमात्र ॥७८॥

वैश्याचें स्वधर्माचरण । नेमेंसीं द्यावें नित्यदान ।

प्राणान्त मांडल्या जाण । दानखंडण हों नेदी ॥७९॥

परलोकप्राप्तीचें कारण । `ब्राह्मणाची सेवा' जाण ।

ब्राह्मणआज्ञा परम प्रमाण । विशेष जाण गुरुसेवा ॥१८०॥

वेदशास्त्रार्थ प्रमाण । सद्‍गुरु परब्रह्म जाण ।

तद्‌रूपें देखावे ब्राह्मण । सेवेसी प्राण अर्पावा ॥८१॥

मी मान्य होईन अतिश्रेष्ठां । कां लौकिकीं जोडावी प्रतिष्ठा ।

ऐशी जे दांभिक निष्ठा । वैश्या वरिष्ठा स्पर्शेना ॥८२॥

सांडूनियां धूर्तपण । निर्लोप `निर्दंभ' जाण ।

विप्रसेवेसी वोपिती प्राण । हें मुख्य लक्षण वैश्याचें ॥८३॥

येणेंचि परमार्थप्राप्ती । सत्य जाण वैश्ययाती ।

हे स्वाभाविक गा प्रकृती । जाण निश्चितीं वैश्याची ॥८४॥

आतां शूद्राचिया प्रकृती । त्रिविध कर्मांची पैं प्राप्ती ।

तेही सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥८५॥