श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४३ वा

शिलोञ्छवृत्त्या परितुष्टचित्तो धर्मं महान्तं विरजं जुषाणः ।

मय्यर्पितात्मा गृह एव तिष्ठन्नातिप्रसक्तः समुपैति शान्तिम् ॥४३॥

शिल अथवा उंछवृत्ती । करूनि संतुष्ट चित्तवृत्ती ।

विषयवैराग्यें मत्प्राप्ती । पूजिती अतिथी मद्‍भावें ॥२६॥

अतिथि आलिया देख । प्राणांतींही नव्हे पराङ्‍मुख ।

नाठवे निज तहानभूक । समयीं आवश्यक दे अन्न ॥२७॥

तेथ अत्यादरेंसीं जाण । देऊनि अत्यंत सन्मान ।

यथानुशक्त्या देतां अन्न । मी जनार्दन संतुष्टें ॥२८॥

सांडूनियां अभिमान । सर्व जीवांसी सर्वदा लीन ।

या नांव `महद्धर्म' जाण । शुद्ध लक्षण हें धर्माचें ॥२९॥

ऐसें जें स्वधर्माचरण । तें कर्त्यासी अतिभूषण ।

ये धर्मीं न रिघे दूषण । `अतिशुद्धाचरण' या नांव ॥४३०॥

मजमाजीं रंगली चित्तवृत्ती । यालागीं विसरला गृहासक्ती ।

त्यासी गृहश्रमीं माझी प्राप्ती । सुखसंपत्ती निजबोधु ॥३१॥

निर्धनासी ऐशिया रीतीं । गृहश्रमीं माझी प्राप्ती ।

आतां सधनाचे प्राप्तीची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥३२॥

सधन होय जैं सज्ञान । तैं न करितां अतिसाधन ।

माझी प्राप्ती अतिसुगम जाण । ऐक लक्षण तयाचें ॥३३॥