श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४५ वा

सर्वाः समुद्धरेद्‍राजा पितेव व्यसनात्प्रजाः ।

आत्मानमात्मना धीरो यथा गजपतिर्गजान् ॥४५॥

सर्वांचें आपत्तींत रक्षण । रायें करावें आपण ।

दीन दुर्बळ ब्राह्मण । अयाचित जन शोधूनी ॥४५॥

व्यसनप्राप्त निजात्मजा । पिता संरक्षणीं निघे पैजा ।

तेवीं आपत्तीपासोनि प्रजा । संरक्षणीं राजा सादर ॥४६॥

करूनि प्रजांचें संरक्षण । आपुल्या आपत्तीसी आपण ।

स्वयें करावें निवारण । हा स्वधर्म जाण रायाचा ॥४७॥

चिखलीं रुतल्या भद्रजाती । स्वयें निघे आत्मशक्तीं ।

गजी गजशावे नेणों किती । काढी रुतीबाहेरी ॥४८॥

तेवीं राजा जो भूपती । तेणें प्रजा रक्षाव्या आपत्तीं ।

आपुलेही आपत्तीची निवृत्ती । निजात्मशक्तीं जो करी ॥४९॥

ऐशिया स्वधर्मस्थिती । सादरें वर्ते जो भूपती ।

त्याच्या स्वधर्माची फलप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥४५०॥