श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५५ वा

कर्मभिगृहमेधीयैरिष्ट्वा मामेव भक्तिमान् ।

तिष्ठेद्वनं वोपविशेत् प्रजावान् वा परिव्रजेत् ॥५५॥

गृहीं असोनि आश्रमस्थितीं । ज्यासी मुख्यत्वें भगवद्‍भक्ती ।

त्यासी आश्रमांतरप्राप्ती । न लगे निश्चितीं मद्‍भक्तां ॥८॥

तेंचि माझें कैसें भजन । स्वाहा स्वधा यज्ञदान ।

जें जें येथें अर्पे जाण । तें तें मदर्पण निश्चित ॥९॥

काळीं अकाळीं सर्वथा । भजनीं पालट नाहीं चित्ता ।

ऐशी ज्या गृहस्थाची अवस्था । तेणें असावें सर्वथा गृहाश्रमीं ॥५१०॥

ज्या कर्माची अतिआसक्ती । आणि विषयांची अनासक्ती ।

नाहीं ज्ञानयुक्त निजशांती । त्यासी वानप्रस्थीं । अधिकारु ॥११॥

ज्यासी विरक्ति शांति ज्ञानस्थिती । करतळामळक हस्तप्राप्ती ।

त्यासी संन्यासग्रहणस्थिती । जाण निश्चितीं अधिकार ॥१२॥

जाहलिया पुत्रसंतती । भार्या देऊनि पुत्राच्या हातीं ।

संन्यास करावा निश्चितीं । श्रुति ये अर्थीं संमत ॥१३॥

ज्यासी गृहस्थाश्रमीं नावडे भक्ती । अपार पोरांची संतती ।

जाहल्याही न धरी विरक्ती । जो वानप्रस्थीं रिघेना ॥१४॥

ज्याचा न फिटे विषयभ्रम । जो संन्यासी नव्हे निष्कर्म ।

त्याचें जाण निंद्य कर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥१५॥