श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५७ व ५८ वा

एवं गृहाशयाक्षिप्त हृदयो मूढधीरयम् ।

अतृप्तस्ताननुध्यायन् मृतोऽन्धं विशते तमः ॥५७॥

इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां

संहितायामेकादशस्कन्धे सप्तदशोऽऽध्यायः ॥५८॥

यापरी गृहासक्तीं आसक्त । सदा विषयीं अतृप्तचित्त ।

अखंड स्त्रीपोत्रांतें ध्यान । हृदयाआंत मोहित ॥२६॥

त्या मोहाचे मोहविधीं । मूढ जाहली हृदयबुद्धी ।

ऐसा निमाला जो त्रिशुद्धी । तो प्रवेशे अंधीं महातमीं ॥२७॥

ज्या तमाचेनि महबळें । ज्ञान हो‍ऊनि ठाके आंधळें ।

तैथ सूर्याचे फुटती डोळे । ते तमीं लोळे तो तामस ॥२८॥

ज्या तमापासूनि उपरती । हों नेणें गा कल्पांतीं ।

त्या अंध-तमातें पावती । मूढमति अतिमंद ॥२९॥

महामोहाचे परिपाटीं । नश्वर विषयासाठीं ।

चुकोनि अनंतसुखाची पुष्टी । दुःखकोटी भोगिती ॥५३०॥

यालागीं मनुष्यदेहीं जाण । करोनियां भगवद्‍भजन ।

चुकवावें जन्ममरण । आपण आपण उद्धरावें ॥३१॥

जीवा जे जे योनीं जन्मगती । तेथ तेथ विषयासक्ति ।

तेचि मनुष्यदेहीं विषयस्थिती । तैं परमार्थप्राप्ती कोणे देहीं ॥३२॥

विशेषें उत्तमोत्तम । प्राप्त जाहल्या ब्राह्मणजन्म ।

ज्याचे नित्यकर्मीं परब्रह्म । अतिसुगम सहजचि ॥३३॥

ज्यासी वर्ततां अहोराती । संध्यावंदनविधानस्थिती ।

त्रिकाळ पापाची निवृत्ती । जाण निश्चितीं ब्राह्मणा ॥३४॥

सकळ साराची सारमूर्ति । तो गायत्रीमंत्र ज्याचे हातीं ।

वेद मुखाची वास पाहती । एवढी प्राप्ती ब्राह्मणा ॥३५॥

ब्राह्मणाचे हृदयीं जाण । वेदरूपें नारायण ।

स्वयें राहिला आपण । धन्य ब्राह्मण त्रिलोकीं ॥३६॥

ज्या ब्राह्मणासी सदा जाण । शिरीं वंदिती सुरगण ।

ज्या ब्राह्मणाचा श्रीचरण । स्वयें नारायण हृदयीं वाहे ॥३७॥

ज्याअंगीं एक रती । पाप न राहे संध्येहातीं ।

त्यालागीं ब्राह्मण पुण्यमूर्ती । स्वयें रमापती बोलिला ॥३८॥

ज्याची भगवंत करी वर्णना । `किंपुनर्ब्राह्मणाः पुण्याः' ।

त्या भगवद्‍गीतावचना । सत्यत्व जाणा या हेतू ॥३९॥

ब्राह्मण आणि भगद्‍भक्त । तैं सकळ भाग्य आलें तेथ ।

त्यासी कोण अर्थ अप्राप्त । ज्याचे बोलांत हरि तिष्ठे ॥५४०॥

ते काष्ठपाषाणप्रतिमे पहा हो । प्रतिष्ठिती तेथ प्रकटे देवो ।

एवढा ब्राह्मणीं सद्‍भावो । सहजान्वयो सामर्थ्य ॥४१॥

तो पावोनियां ब्राह्मणजन्म । जो करी क्षुद्र विषयकर्म ।

त्याचे हातींचा गेला पुरुषोत्तम । अंधतम तो पावे ॥४२॥

एका-जनार्दनाची विनंती । येऊनि मनुष्यदेहाप्रती ।

करोनियां भगद्‍भक्ती । निजात्मप्राप्ती साधावी ॥५४३॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे

ब्रह्मचर्यगृहस्थकर्मधर्मनिरूपणे एकाकारटीकायां सप्तदशोऽध्यायः ॥१७॥॥श्लोक ॥५८॥ओव्या ॥५४३॥