श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा

ज्ञानविज्ञानसंसिद्धाः पदं श्रेष्ठं विदुर्मम ।

ज्ञानी प्रियतमोऽतो मे ज्ञानेनासौ बिभर्ति माम् ॥३॥

ज्ञानविज्ञाननिजसंपत्ती । जाहलियावीण माझी प्राप्ती ।

कोणासी नव्हे स्वरूपस्थिती । मत्पदीं गती ज्ञानविज्ञानें ॥४८॥

करितां गुरुमुखें शास्त्रशुद्धश्रवण । तेणें जाहलें तें म्हणिजे `ज्ञान' ।

त्याचा अनुभव तेंचि `विज्ञान' । ऐक लक्षण त्याचेंही ॥४९॥

स्वयें स्वयंपाक केला जाण । न जाणे कटु मधुर लवण ।

जंव चाखिला नाहीं आपण । ते दशा सज्ञान `ज्ञान' म्हणती ॥५०॥

केलिया रसाचें रसस्वादन । स्वयें गोडी सेवी आपण ।

ऐशी जे दशा तें `विज्ञान' । उद्धवा जाण निश्चितीं ॥५१॥

एवं विज्ञानज्ञाननिजसंपत्तीं । माझ्या उत्तमपदाची पदप्राप्री ।

माझें वास्तवस्वरूप जे जाणती । त्यांची मज प्रीती अनन्यत्वें ॥५२॥

वेद-शास्त्र-युक्तिबळें । माझें स्वरूप काइसेनि न कळे ।

तें ज्यासी वस्तुतां आकळे । मज त्यावेगळें प्रिय नाहीं ॥५३॥

तेंचि अतिप्रीतीचें लक्षण । त्याच्या पा‍उलापाउलीं जाण ।

सर्वांग वोडवीं मी आपण । करीं निंबलोण । सर्वस्वें ॥५४॥

त्यासी जे वेळे जें लागे । तें मी न मागतां पुरवीं वेगें ।

त्यासी विरुद्ध ये जेणें मार्गें । तें मी निजांगें निवारीं ॥५५॥

त्यासी झणीं संसारवारा लागे । यालागीं मीच मी पुढेंमागें ।

सभंवतां राहें सर्वांगें । अतिप्रीतिपांगें पांगलों ॥५६॥

जेणें ज्ञानें ज्ञानी प्रिय होती । त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती ।

देवो सांगे उद्धवाप्रती । यथार्थस्थिती निजबोधें ॥५७॥