श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ७ वा

त्वय्युद्धवाश्रयति यस्त्रिविधो विकारो मायान्तराऽऽपतति नाद्यपवर्गयोर्यत् ।

जन्मादयोऽस्य यदमी तव तस्य किं स्युराद्यन्तयोर्यदसतोऽस्ति तदेव मध्ये ॥७॥

`मी उद्धव' ऐसें म्हणतां । तूं कोण आहेसी तत्त्वतां ।

ऐक त्या स्वरूपाची कथा । तुज मी आतां सांगेन ॥८०॥

जन्म स्थिति आणि निधन । त्रिविधविकारेंसीं त्रिगुण ।

त्यांची अधिष्ठात्री माया जाण । तिसी चळण तुझेनी ॥८१॥

मायादि गुणकार्यां समस्तां । तूं आश्रयो पैं सबाह्यतां ।

तुझेनि अंगें यासी चपळता । तूं यापरता चिदात्मा ॥८२॥

`माझेनि गुणकर्मा चळणता । तैं प्रपंचासी आली सत्यता' ।

हें मायामय गा तत्त्वतां । मृगजळता आभासु ॥८३॥

सकळ प्रपंचाचें जें भान । तें तंव मृगजळासमान ।

दिसे तेंही मिथ्या दर्शन । वस्तुत्वें जाण सत्य नव्हे ॥८४॥

तूं जन्ममरणापरता । त्रिगुणांतें नातळता ।

प्रपंचासी अलिप्तता । तुझी तत्त्वतां तूं ऐक ॥८५॥

तेचि प्रपंचाची अलिप्त युक्ती । ऐशी आहे परम प्रतीती ।

उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । प्रपंचाची वस्ती सत्यत्वें नाहीं ॥८६॥

उत्पत्ति आदीं प्रपंच नसे । अंतीं कांहीं उरला न दिसे ।

मध्यें जो कांहीं आभासे । तो मायावशें मिथ्याभूत ॥८७॥

प्रपंचाआदीं परब्रह्म । अंतीं तेंचि उरे निरुपम ।

मध्यें स्थितिकाळीं तेंचि ब्रह्म । मिथ्या भवभ्रम भ्रांतासी ॥८८॥

सूर्याआदीं मृगजळ नसे । अस्तमानीं उरलें न दिसे ।

मध्यें जें काहीं आभासे । तेथही नसे जळलेश ॥८९॥

सर्पाआदीं दोरत्वें दोरु । अंतीं दोर उरे साचारु ।

मध्यें भ्रमें भासे सर्पाकारु । तोही दोरु दोररूपें ॥९०॥

यापरी आद्यंतीं विचारिता । वस्तु सत्य प्रपंच मिथ्या ।

हें उद्धवा जाण तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां संमत ॥९१॥

ऐशी या प्रपंचाची घडामोडी । होतां जन्ममरणकोडी ।

उद्धवा तुज न लागे वोढी । तूं परापरथडीं नित्यमुक्त ॥९२॥

निर्गुण निःसंग निर्विकार । अज अव्यय अक्षर ।

ब्रह्म अनंत अपरंपार । तें तूं साचार उद्धवा ॥९३॥

हे ऐकोनि देवाची गोष्टी । उद्धवें बांधिली शकुनगाठीं ।

हरिखें आनंदु न जिरे पोटीं । एकला सृष्टीं न समाये ॥९४॥

`तूं ब्रह्म' म्हणतां यदुराजें । तेणें हरिखाचेनि फुंजें ।

उद्धव नाचे स्वानंदभोजें । वैकुंठराजे तुष्टले ॥९५॥

स्वमुखें तुष्टोनि श्रीकृष्ण । मज म्हणे `तूं ब्रह्म पूर्ण' ।

आजि मी सभाग्य धन्य धन्य । धांवोनि श्रीचरण वंदिले ॥९६॥

`तूंचि अंगें परब्रह्म' । ऐसें बोलिला मेघश्याम ।

तेचि अर्थींचें निजवर्म । उद्धव सप्रेम पूसत ॥९७॥