श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

श्रीभगानुवाच-

इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतां वरम् ।

अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषां नोऽनुश्रृण्वताम् ॥११॥

तुवां पुशिलें जैशा रीतीं । तैसियाचि गा उपपत्तीं ।

धर्में पुशिले भीष्माप्रती । देहांतीं शरपंजरीं ॥३७॥

ऐक त्या धर्माची थोरी । ज्यासी शत्रु नाहीं संसारीं ।

सत्यवादी निजनिर्धारीं । जो ऋषिमंत्रीं जन्मला ॥३८॥

करावया पांडवनिर्दळण । वज्रदेही व्हावया आपण ।

वर्म पुसतां दुर्योधन । धर्म असत्य वचन न बोले ॥३९॥

ऐसा राजा युधिष्ठिर । निर्मत्सर परम पवित्र ।

तेणें करूनि अत्यादर । भीष्म महावीर विनविला ॥१४०॥

जो परम धार्मिक निजनिर्धारीं । जो स्वधर्मनियमें व्रतधारी ।

जो यावज्जन्म ब्रह्मचारी । जो महाशूरीं वंदिजे ॥४१॥

न मोडतां गुरुत्वाची पायरी । जो परशुरामेंसीं युद्ध करी ।

परी काशीश्वराची कुमरी । जो न करीच नोवरी ब्रह्मचर्यें ॥४२॥

धनुर्विद्येसी गुरु परशुराम । तो रणीं जिंतिला करूनि नेम ।

तेणें संतोषोनि परम । आपुलें नाम आंकणां घातलें ॥४३॥

अधिक संतुष्टे परशुराम । माझ्या ब्रह्मचर्याचा व्रतनेम ।

भीष्मा तुज कदा बाधिना काम । वर परम दीधला ॥४४॥

जनकसंतोषाकारणें । आपुलें तारुण्य दीधलें जेणें ।

वार्धक्य घेऊनि आपणें । सुखी करणें शंतनु ॥४५॥

पित्यानें दीधलें आशीर्वादा । `ऐक भीष्मा अतिप्रबुद्धा ।

वार्धकीं क्षीणशक्तीची आपदा । ते तुज कदा बाधेना' ॥४६॥

यालागीं जंव जंव म्हातारपण । तंव तंव त्याचा प्रताप गहन ।

काळाची शक्ति खुंटली जाण । ज करवे क्षीण भीष्मासी ॥४७॥

यालागीं तोडरीं काळ काम । आंकणा रिघाला परशुराम ।

हाचि धर्मिष्ठीं `वरिष्ठधर्म' । हें साजे नाम भीष्मासी ॥४८॥

ज्याचिये प्रतिज्ञेच्या निर्धारीं । देवासी लावूनियां हारी ।

निःशस्त्रा करी शस्त्रधारी । एवढी थोरी प्रतिज्ञेची ॥४९॥

न मोडतां भजनमर्यादा । युद्धीं मिसळोनि गोविंदा ।

हारी लावूनियां मुकुंदा । चरणारविंदा लागला ॥१५०॥

आण वाहूनि निर्धारीं । शस्त्रास्त्रें सांडिलीं दूरीं ।

पुढती बाण भेदितां जिव्हारीं । शस्त्र करीं न धरीच ॥५१॥

बाणीं खडतरलें जिव्हार । विकळता देखोनि थोर ।

भीष्में करूनि निजनिर्धार । जाहला तत्पर देहत्यागा ॥५२॥

हें दक्षिणायन अतिघोर । भीष्में ऐकतां उत्तर ।

काळासी करूनियां दूर । स्वशरीर राखिलें ॥५३॥

मग निजात्मनिर्धारीं । भीष्म पहुडे शरपंजरीं ।

त्यातें युधिष्ठिर प्रश्न करी । महाऋषीश्वरीं परिवारिला ॥५४॥

आम्हां सकळां देखतां । जाहला युधिष्ठिर पुसता ।

तेचि पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥५५॥