श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानं चतुष्टयम् ।

प्रमाणेष्वनवस्थानाद्विकल्पात्स विरज्यते ॥१७॥

एक अद्वैत ब्रह्म पाहीं । दूसरें आणिक कांहीं नाहीं ।

प्रपंच विथ्या वस्तूचे ठायीं । हें प्रमाण पाहीं `वेदवाक्य' ॥९७॥

`प्रत्यक्ष' देखिजे आपण । देहादिकांचें नश्वरपण ।

हें दुसरें परम प्रमाण । जें क्षणिकत्व जाण प्रपंचा ॥९८॥

मार्कंडेयो आणि भुशुंडी । इंहीं प्रपंचाची राखोंडी ।

देखिली गा रोकडी । वेळां कोडी कल्पांतीं ॥९९॥

महाजनप्रसिद्ध हें श्रवण । प्रपंचासी क्षणिकपण ।

हें तिसरें गा प्रमाण । उद्धवा जाण `ऐतिह्य' ॥२००॥

शास्त्रप्रसिद्धी अनुमान । मिथ्या प्रपंचाचें भान ।

दिसे मृगजळासमान । वस्तुतां जाण असेना ॥१॥

दोर दोरपणें साचार । भ्रमें भासे नानाकार ।

काष्ठ सर्प कीं मोत्यांचा हार । ना हे जळधार जळाची ॥२॥

तेवीं वस्तु एक चिद्‍घन । तेथ भ्रमें मतवाद गहन ।

हें शून्य किंवा सगुण । कर्मधर्माचरण तें मिथ्या ॥३॥

यापरी करितां `अनुमान' । मिथ्या प्रवृत्तिप्रपंचज्ञान ।

हें वेदान्तमत प्रमाण । सत्य जाण उद्धवा ॥४॥

तंतूवेगळा पट कांहीं । योजेना आणीकिये ठायीं ।

तेंवी ब्रह्मावेगळा पाहीं । प्रपंचु नाहीं सत्यत्वें ॥५॥

चहूं प्रमाणीं प्रपंचस्थिती । मिथ्या साधिली निश्चितीं ।

ते प्रपंचीं विषयासक्ती । सांडूनि विरक्ती धरावी ॥६॥

येचिविखींचें निरूपण । स्वयें सांगताहे नारायण ।

उभय लोकीं विषयध्यान । तें मिथ्या जाण अमंगळ ॥७॥