श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम् ।

परिनिष्ठा च पूजायां स्तुतुभिःस्तवनं मम ॥२०॥

अमृतरूपा ज्या माझ्या कथा । श्रद्धायुक्त श्रवण करितां ।

फिकें करूनियां अमृता । गोडी भक्तिपंथा तत्काळ लागे ॥१७॥

अमर अमृतपान करिती । तेही शेखीं मरोनि जाती ।

माझें कथामृत जे सेविती । ते नागवती कळिकाळा ॥१८॥

सेवितां कथासारामृत । अतिशयें जाहले उन्मत्त ।

मातले मरणातें मारित । धाकें पळे समस्त संसारु ॥१९॥

सेवितां कथामृतसार । मद्‍भावीं रंगलें अंतर ।

तैं माझे गुण माझें चरित्र । गाती सादर उल्हासें ॥२२०॥

माझे नाम माझीं पदें । नाना छंदें अद्वैतबोधें ।

कीर्तनीं गाती स्वानंदें । परमानंदें डुल्लत ॥२१॥

सप्रेम संभ्रमाचे मेळीं । गर्जती नामाच्या कल्लोळीं ।

नामासरिसी वाजे टाळी । जाहली होळी महापापां ॥२२॥

ऐशिया कीर्तनाचे आवडीं । जाहलीं प्रायश्चित्तें देशधडी ।

तीर्थें हो‍ऊनि ठेलीं बापुडीं । फिटलीं सांकडीं जपतपांचीं ॥२३॥

ऐकोनि कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकींचा व्यापार ।

रिकामें यमकिंकर । यमें पाशभार लपविला ॥२४॥

देखोनि कीर्तनाचे गोडी । देव धांवे लवडसवडीं ।

वैकुंठींहूनि घालीं उडी । अतितांतडीं स्वानंदें ॥२५॥

ऐसा कीर्तनाचा गजर । करितां नित्य निरंतर ।

त्या अधीन मी श्रीधर । भुललों साचार कीर्तनें ॥२६॥

जैसें कीर्तन तैशीच पूजा । आदरें पूजी गरुडध्वजा ।

पुष्पादिसंभारसमाजा । अतिवोजा घमघवीत ॥२७॥

अतिनिष्ठा सावधान । यापरी करी माझें पूजन ।

माझी स्तुति माझें स्तवन । रिकामा अर्ध क्षण जावों नेदी ॥२८॥