श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २२ वा

मदर्थेष्वङ्गचेष्टा च वचसा मद्‍गुणेरणम् ।

मय्यर्पणं च मनसः सर्वकामविवर्जनम् ॥२२॥

लौकिक शरीर कर्मगती । तद्वारा निपजे माझी भक्ती ।

अभिनव माझी भजनस्थिती । सांगों किती उद्धवा ॥४५॥

बैसोनियां हाटवटीं । सांगतां लौकिकीही गोष्टी ।

त्यांमाजीं माझे कीर्तन उठी । मद्‍गुणें गोमटी गर्जे वाचा ॥४६॥

स्वधर्मकर्मक्रिया करणें । तेही अर्पी मजकारणें ।

मजवेगळें कांहीं करणें । करूं नेणे अणुमात्र ॥४७॥

सर्वेंद्रियांचिये स्थितीं । सहजें निपजे माझी भक्ती ।

माझें नाम माझी कीर्ती । वाचा रिती राहो नेणे ॥४८॥

मनासी आवडे जें जें कांहीं । ते तें अर्पी मजचि पाहीं ।

शेखीं आपुलें मन तेंही । माझ्या ठायीं समर्पीं ॥४९॥

माझे स्वरूपाचे ठायीं जाण । केवीं घडे मनाचें अर्पण ।

तेचिविषयींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥२५०॥