श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २४ वा

एवं धर्मैर्मनुष्याणामुद्धवात्मनिवेदिनाम् ।

मयि सञ्जायते भक्तिः कोऽन्योऽर्थोऽस्यावशिष्यते ॥२४॥

सर्व कर्में मदर्पण । करितां शुद्ध होय मन ।

जेवीं लोह कमावितां जाण । होय दर्पण सोज्ज्वळ ॥६२॥

पुटीं घालितां सुवर्ण । अधिक तेज चढे जाण ।

करितां वस्त्राचें क्षाळण । स्वच्छपण धोवटी ॥६३॥

तैसीं सर्व कर्में मदर्पण । करितां निर्मळ होय मन ।

ते काळीं मनाचें अर्पण । मद्‌रूपीं जाण हों लागे ॥६४॥

पूर दाटलिया सरितांसी । सवेग ठाकती सिंधूसी ।

तेवीं निर्मळत्वें मनासी । माझ्या स्वरूपासी पावणें ॥६५॥

माझे स्वरूपीं मनाचे स्थिती । तैं आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।

हे तीनही ते काळीं हारपती । माझी भक्ती चौथी उल्हासे ॥६६॥

माझें भांडवल मज एक भक्ती । तेथ दुजी तिजी आणि चौथी ।

हे साधकांची साधनभ्रांती । बहुता भक्ती मज नाहीं ॥६७॥

तेचि माझी मुख्य भक्ती । येणें साधनें होय प्राप्ती ।

जे भक्तीस्तव भक्त म्हणविती । ब्रह्मा उमापती सनकादिक ॥६८॥

निःशेष मावळल्या अहंकृती । भूतें निजात्मरूप दिसती ।

माझ्या स्वरूपाची `सहजस्थिती' । ते माझी मुख्य भक्ती उद्धवा ॥६९॥

ये भक्तीच्या लेशस्थितीं । आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।

प्रकाशले गा वर्तती । निजस्वार्थी साधक ॥२७०॥

हेचि आर्ताच्या विषयीं । आर्तीतें प्रकाशी पाहीं ।

मग `आर्त' ऐसे त्याच्या ठायीं । नांवाची नवायी उपतिष्ठे ॥७१॥

रोगिया नांव आर्तता । हें व्याख्यान नव्हे परमार्था ।

भगवत्प्राप्तीची तीव्र व्यथा । ते आर्तता परमार्थी ॥७२॥

जो भगवंताचे प्राप्तीलागीं । कडां घालूं धांवे वेगीं ।

कां रिघों पाहे जळते आगीं । तो `आर्ता' सावेगीं बोलिजे ॥७३॥

आर्ताची स्थिति ऐसी । जिज्ञासु निवारी त्यासी ।

मनुष्यदेह ब्रह्मप्राप्तीसी । तो आत्महत्येसी नको योजूं ॥७४॥

मागील भक्त कोणें रीतीं । जाणोनि पावले भगद्‍भक्ती ।

जीवेंभावें त्या विवरी युक्ती । `जिज्ञासा' निश्चितीं या नांव ॥७५॥

मज जाणावयाची ऐशी जे आशा । तीतें म्हणती शुद्ध `जिज्ञासा' ।

तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा । मी जिज्ञासु ऐसा तेणें जाणें ॥७६॥

ब्रह्मप्रापक युक्तीचा ठसा । या नांव `शुद्ध-जिज्ञासा' ।

वेदशास्त्रजाणीववळसा । `लौकिक-जिज्ञासा' त्या नांव ॥७७॥

सर्वां अर्थीं मीचि अर्थना । शुद्ध `अथार्थी' या नांव जाणा ।

म्हणती अर्थार्थीं द्रव्यकामना । ते मंद व्याख्याना प्रवर्तती ॥७८॥

दृष्टी पडे नाना अर्थीं । जो विवंचोनि लावी परमार्थीं ।

त्या नांव बोलिजे `अर्थार्थीं' । त्यातेंही निजभक्ती प्रकाशे माझी ॥७९॥

एवं आर्त-जिज्ञासु-अर्थार्थी । त्यांतें प्रकाशे माझी `सहजभक्ती' ।

तीतें भक्त चतुर्धा मानिती । अधिकारस्थितिविभागें ॥२८०॥

भक्त कल्पनेचिया भ्रांती । माझी भक्ति चतुर्धा मानिती ।

ते मिथ्या गा वदंती । माझी निजभक्ती एकली ॥८१॥

ऐशिये निजभक्तीची प्राप्ती । आत्मनिवेदनाची स्थिती ।

उद्धवा म्यां तुजप्रती । यथानिगुतीं निरूपिली ॥८२॥

माझिये निजभक्तीचें सार । भक्त पावले जे साचार ।

त्यांचे सर्वही व्यापार । मदाकार हो‍ऊनि ठाकती ॥८३॥

तो जेउती वास पाहे । ते दिशाचि मी हो‍ऊनि ठायें ।

तो जेउतें चालवी पाये । ते धरा मी होयें धराधर ॥८४॥

तो करूं बैसल्या भोजन । षड्रस होय मी आपण ।

त्यासी करावया प्राशन । निजजीवन मी होयें ॥८५॥

त्यासी चालतां निजपदीं । बोधें दृष्याची निवारीं मांदी ।

शांति पायघड्या घाली आधीं । करी पदोपदीं निंबलोण ॥८६॥

शम दम आज्ञाधारी । हात जोडूनि उभे द्वारीं ।

ऋद्धिसिद्धी दासी घरीं । विवेक कामारी घरींचा सदा ॥८७॥

त्याचा बैसता अवकाश । अंगें मी होय हृषीकेश ।

तो निजावया सावकाश । समाधि मी त्यास आंथुरीं ॥८८॥

तो जे कांहीं बोल बोले । ते निःशब्द ब्रह्म-शब्दा आलें ।

यालागीं श्रोत्यांसी वहिलें । होय भलें समाधान ॥८९॥

तो अवलीला बोले वोठीं । शब्दासवें माझी गोठी उठी ।

श्रोत्यांची तेथ पडे मिठी । स्वभावें गोठी ऐकतां ॥२९०॥

चढतां परेचे उपरी । वैकुंठ कैलास पायरी ।

उन्मनी घालोनि बाहेरी । सुखशेजारीं तो पहुडे ॥९१॥

मिळोनियां मुक्ती चारी । पाणी वाहती त्याच्या घरीं ।

श्रीसहित राबें मी श्रीहरी । येरांची थोरी कोण पुसे ॥९२॥

अवचटें ये त्याच्या मुखासी । म्हणे ज्यासी `तूं उद्धरिलासी' ।

तो माथां वाहें मी हृषीकेशी । शब्दें निजधामासी पाववीं वेगीं ॥९३॥

जे पावले माझी `सहजभक्ती' । त्यांचे लळे पाळीं मी या रीतीं ।

त्यांची मज अनन्य प्रीती । सांगों किती उद्धवा ॥९४॥

बहुत बोलीं काय कारण । मी देहो तो आत्मा जाण ।

तो माझा जीवप्राण । हे जाणती खूण निजभक्त ॥९५॥

नांदतां `सहजभक्ती' आंत । मी देवो तो माझा भक्त ।

येरवीं मी सगळा त्याआंत । तो समस्त मजमाजीं ॥९६॥

निजभक्त मजभीतरीं । मी तया आंतबाहेरी ।

ऐसे सामरस्यें नांदों भारी । वेगळे बाहेरीं नाममात्र ॥९७॥

माझिया सायुज्या जे आले । ते मीचि हो‍ऊनियां ठेले ।

परी मी हो‍ऊनि मज भजलें । ते `भक्त' मानिले म्यां ऐसे ॥९८॥

सायुज्यापरीस भक्ति गोड । याचि निरूपणांचे कोड ।

उद्धवा तुझी जाणोनि चाड । विशद निवाड सांगितला ॥९९॥

ऐशिया माझ्या निजभक्तांसी । अवशेष अर्थ नुरेचि त्यांसी ।

मी तुष्टलों गा हृषीकेशी । निज भावासी सर्वस्वें ॥३००॥

`भक्तिप्राधान्य भागवतशास्त्र' । तें निजभक्तीचें निजसार ।

तुज मी सांगितले साचार । अत्यादरपूर्वक ॥१॥

उद्धवा तुझे प्रीतीचेनि व्याजें । मज गुह्यांचें निजगुह्य हें जें ।

तें भक्तीचें करूनियां खाजें । तुज म्यां वोजें दीधलें ॥२॥

म्यां सांगितलें जैशा रीतीं । तैशी सेवावी माझी निजभक्ती ।

ऐसें बोलत श्रीपती । उद्धव प्रीतीं उचलिला ॥३॥

मागां टाकूनि पीतांबरें । सांडोनियां शंखचक्रें ।

उद्धव उचलिला श्रीधरें । तरी प्रेम न सांवरे देवाचें ॥४॥

हांव न बाणेचि दों करीं । मग चारी भुजा पसरी ।

उद्धवातें हृदयावरी । प्रीतीं थोरीं आलिंगी ॥५॥

हृदयीं हृदय एक जाहलें । ये हृदयींचें ते हृदयीं घातिलें ।

कृष्णें सर्वस्व जें आपुलें । तें हृदयीं सूदलें उद्धवाचे ॥६॥

देव आवाप्तकाम निचाड । त्यासीही भक्तीची ऐसी चाड ।

अतिशयें उद्धव लागला गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥७॥

उद्धव प्रेमाचा लवलाहो । आलिंगन सोडूं विसरे देवो ।

कृष्णहृदया हृदय जडल्या पहा हो । उद्धवा उद्धवो विसरला ॥८॥

ऐसे स्वानंदीं वाडाकोडा । दोघेहि मिसळले निचाडचाडा ।

भक्तिसुखाचा सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥९॥

कृष्णें सर्वस्व आपुलें । उद्धवाचे हृदयीं सूदलें ।

हें उद्धवा कळों नाहीं दीधलें । लाघव केलें गोविंदें ॥३१०॥

हा अर्थ कळल्या उद्धवासी । हा ये‍ईल मजसी ऐक्यासी ।

पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशीं सांगावी ॥११॥

उद्धवा मज वाडेंकोडें । अखंड हेंचि बोलों आवडे ।

परी तैसा श्रोता न जोडे । हें थोर सांकडें मजलागीं ॥१२॥

भक्तिसुखाचा सुरवाड । सांगतां माझें पुरे कोड ।

ऐसा श्रोता कैंचा गोड । यालागीं उद्धवा आड प्रेम सूये ॥१३॥

सूर्यापासूनि फांकती किरण । तैसें सुटलें आलिंगन ।

कृष्ण उद्धव जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडे ना ॥१४॥

पुढील कथेची संगती । दूर ठेली श्लोकसंगती ।

श्रोतां विरुद्ध न घ्यावें चित्तीं । समूळार्थ निश्चितीं विचारावा ॥१५॥

मूळींचें पद संकोचित । तेथ उत्तम भक्तिभावार्थ ।

स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि म्यां अर्थ विस्तरिला ॥१६॥

नारळांतल्या वस्त्राची घडी । उकलितां थोर वाढे वाढी ।

तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥१७॥

मूळपदाचा पदपदार्थ । श्लोकीं पहावा सावचित्त ।

श्लोकौत्तरार्धीं भगवंत । ध्वनितार्थ बोलोनि गेला ॥१८॥

त्याचि ध्वनिताचे पोटीं । होती भक्तिरहस्याची पेटी ।

ते म्यां उघडूनि दाविली दिठीं । वृथा चावटी झणें म्हणाल ॥१९॥

तंव श्रोते म्हणती नवल येथ । मूळींचें पद होतें गुप्त ।

तें काढिलें भक्तिसारामृत । सुहृदयस्थ हरीचें ॥३२०॥

तुझे हृदयीं श्रीकृष्णनाथ । प्रकटोनि आपुलें हृद्‍गत ।

ग्रंथीं असे बोलवित । हें सुनिश्चित कळलें आम्हां ॥२१॥

आम्हा ऐकतां भक्तिसारामृत । चित्तीं चैतन्य उथळत ।

होशी देखणा सुनिश्चित । ग्रंथ यथार्थ अर्थिला ॥२२॥

हें ऐकोनि संतांचे वचन । हरिखला एकाजनार्दन ।

मस्तकीं वेदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥२३॥

निजभक्तीचे दृढीकरण । आदरें करिताहे श्रीकृष्ण ।

सांगितलें तेंचि निरूपण । पुढती जाण सांगता ॥२४॥