श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २६ वा

यदर्पितं तद्विकल्पे इंद्रियैः परिधावति ।

रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥२६॥

जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ । साच न म्हणे तो परमार्थ ।

जो ग्रहदाराद्रव्यासक्त । लोलंगत विषयांसी ॥३५॥

तेणें अत्यंत समळमेळें । दारुण रजोगुण खवळे ।

तेणें चित्त होय ज्ञानांधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥३६॥

ज्यासी विषयांच्या युक्ती गहन । त्यासी म्हणती अतिसज्ञान ।

जो करी युक्तीचें छळण । होय मान्य पंडितपणें ॥३७॥

ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार । त्यास म्हणती भाग्य थोर ।

जो नाना भोगीं पाळी शरीर । सुकृती नर त्या म्हणती ॥३८॥

जो अनुपाती परमार्थविखीं । त्यासी म्हणती परम दुःखी ।

जो नाना विषयांतें पोखी । त्यांते महासुखी मानिती ॥३९॥

ज्याचेनि बोलें मनुष्य मरे । त्याचें सिद्धत्व मानिती खरें ।

जो उदास राहटे अनाचारें । मुक्त निर्धारे तो म्हणती ॥३४०॥

ज्याचा दांभिक आचार । त्यातें म्हणती पवित्र नर ।

जे स्त्रियादि शूद्रां देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥४१॥

जो कां अनुतापी वैरागी । त्यानें म्हणती अतिअभागी ।

जो उघड विषयांतें भोगी । तो राजयोगी मानिती ॥४२॥

स्वयें द्रव्याचा अभिलाखी । द्रव्य वेंची त्यातें मूर्ख लेखी ।

न वेंची त्यातें म्हणती विवेकी । धर्मज्ञ लोकीं हा एक ॥४३॥

ज्याचे गांठी बहुसाल धन । तो सर्वांसी अवश्य मान्य ।

तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसें विपरीत ज्ञान हों लागे ॥४४॥

आपण सर्वात्मा सर्वेश । हें विसरोनियां निःशेष ।

अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुष हें मानी ॥४५॥

तेथ कैं उपजे माझी भक्ती । कैसेनि होईल माझी प्राप्ती ।

ऐसे भ्रमले नेणों किती । संसार‍आवर्ती वर्ततां ॥४६॥

परमात्मप्राप्तीचीं कारणें । अतिगुह्य चारी लक्षणें ।

पोटंतुल्या कृपागुणें । उद्धवाकारणें हरि सांगे ॥४७॥

धर्माची भजन भोय । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।

माझी प्राप्ती अवश्य होय । ते चारी उपाय अवधारीं ॥४८॥