श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३४ वा

शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यं मदर्चनम् ।

तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥३४॥

शौचाची ऐशी परी । अंतरीं शुचि विवेकेंकरीं ।

बाह्य तें वेदाज्ञेवरी । `शौच' करीं मृज्जलें ॥९५॥

परिसें `जपाचा' विचार । ज्यासी जैसा अधिकार ।

तैसा जपावा नाममंत्र । कां स्वतंत्र गुरुनाम ॥९६॥

ब्राह्मणाचा जप वेदोच्चार । संन्यासी जपे ओंकार ।

द्विजन्म्यासी आगममंत्र । कां नाममंत्र सर्वांसी ॥९७॥

तपाचा जो मुख्य प्रकार । जेणें शुद्ध होय अभ्यंतर ।

तो स्वधर्मीं गा सादर । अत्यादर करावा ॥९८॥

शरीरशोषणा नांव तप । हा मूर्खाचा खटाटोप ।

हृदयीं श्रीहरि चिंतणें सद्‌रूप । परम `तप' या नांव ॥९९॥

ऐक होमाचा विचार । देवाचे मुख वैश्वानर ।

पंचमहायज्ञ अग्निहोत्र । `होम' साचार या नांव ॥४००॥

भजनाची अतिआवडी । कां धर्माची अधिक गोडी ।

या नांव `श्रद्धा' रोकडी । जाण धडपडी उद्धवा ॥१॥

नसतांही अन्नधनें । आतिथ्यें दे समाधानें ।

मस्तकीं वंदूनियां दीनें । निववी वचनें सुखरूपें ॥२॥

दीन देखोनि तत्त्वतां । अतिनम्र विनीतता ।

यथाशक्ति अर्पणें अर्था । `आतिथ्य' तत्त्वतां या नांव ॥३॥

पोटींच्या कळवळेंनि वोजा । अत्यादरें गरुडध्वजा ।

सांङ्ग साजिरी करणें पूजा । श्रद्धा समाजासंभारीं ॥४॥

मेळवूनि ब्राह्मणसंभार । श्रद्धायुक्त षोडशोपचार ।

पूजितां संतोषें मी श्रीधर । `पूजा' पवित्र ब्राह्मणांची ॥५॥

शुद्ध व्हावया अंतःकरण । करावें गा तीर्थगमन ।

तीर्थयात्रीं श्रद्धा गहन । `तीर्थाटन' या नांव ॥६॥

पदोपदीं माझें नाम । गर्जतां स्मरती माझें कर्म ।

यात्रा करणें निजनिष्काम । `तीर्थयात्रा' परम या नांव ॥७॥

परोपकारार्थ पर्वत । जेंवी कां सामग्री वाहत ।

तेवीं क्रियामात्रें उपकारार्थ । सदा वर्तत उपकारीं ॥८॥

जेवीं का चंद्राचे किरण । लागतंचि निवनिती जाण ।

तेवीं जयाचें आचरण । `उपकारें' जन सुखी करी ॥९॥

जें प्राप्त जाहलें अदृष्टीं । तेणें काळ यथासुखें लोटी ।

कदा समासम नाहीं पोटीं । `यथालाभसंतुष्टी' या नांव ॥४१०॥

कायावाचामनें धनें । जो विनटला गुरूकारणें ।

त्याचें उठे संसारधरणें । `गुरुसेवा' म्हणणें या नांव ॥११॥

उभय शौचाचे दोनी गुण । जपादि येर दशलक्षण ।

हे बारा `नेम' जाण । देवो आपण बोलिला ॥१२॥