श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३९ वा

धर्म इष्टं धनं नॄणां यज्ञोऽहं भगवत्तमः ।

दक्षीणा ज्ञानसंदेशः प्राणायामः परं बलम् ॥३९॥

धन धान्य पशु रत्न । हें प्राण्यासी नव्हे इष्ट धन ।

मोक्षामार्गीं सबळ जाण । इष्ट धन तो धर्म ॥७४॥

घरीं जें पुरिलें धन । तें घरींच राहे जाण ।

धर्म तो स्वयें चालतें धन । अंगा बंधन येवो नेदी ॥७५॥

धर्मिष्ठायेवढा कृपण । न देखें मी आणिक जाण ।

मरतांही स्त्रीपुत्रां वंचून । अवघेंचि धन सवें ने ॥७६॥

धार्मिकीं धर्मार्थ वेंचूनि धन । मी भांडारी केला नारायण ।

जे समयीं जें जें लागे जाण । तें मी आपण स्वयें पुरवीं ॥७७॥

यालागीं धर्म तो इष्ट धन । हें सत्य सत्य माझें वचन ।

ऐक यज्ञाचें व्याख्यान । यथार्थ जाण सांगतों ॥७८॥

अग्नि तो माझें मुख जाण । यज्ञभोक्ता मी नारायण ।

अवघा यज्ञचि मी श्रीकृष्ण । परम प्रमाण वेदोक्त ॥७९॥

तेथें माझें स्वरूप ब्राह्मण । मद्दीक्षादीक्षित जाण ।

सद्‍भावें करूनियां यजन । माझें सुख संपूर्ण पावले ॥४८०॥

तेथ अधर्मद्रव्याचेनि कोडें । अविधी दांभिक याग घडे ।

तोही मज मुखींच पडे । परी ते कोरडे खडखडीत ॥८१॥

अविधी जाहले पशुघातकी । तेणें अवदानें मी नव्हें सुखी ।

दंभे पडले कुंभिपाकीं । महानरकीं रौरवीं ॥८२॥

सर्व भूतांच्या भूतमुखीं । अर्पी तें पावे यज्ञपुरुखीं ।

हे दीक्षा नेणोनि याज्ञिकीं । जाहले नारकी हिंसादोषें ॥८३॥

जो मद्‍भावें दीक्षित जाण । विश्वतोमुखीं ज्यांचे यजन ।

तयांचा `यज्ञ' तो मी नारायण । दक्षीणा कोण ते ऐका ॥८४॥

यज्ञासी मोल नाहीं देख । ज्यासी ज्ञानदक्षिणा अमोलिक ।

हातां येतांचि याज्ञिक । महासुख पावले ॥८५॥

दक्षिणा आल्या ज्ञानघन । याज्ञिक होती अतिसंपन्न ।

कल्पांतीं वेंचेना तें धन । निजीं समाधान जीवशिवां ॥८६॥

सर्वांमाजीं प्राण सबळ । प्राणबळें बळी सकळ ।

प्राणयोगें मन चपळ । अतिचंचळ प्राणस्पंदे ॥८७॥

यापरी गा बळिष्ठ प्राण । प्राणाअधीन सदा मन ।

तो प्राण जिंकावा आपण । `बळवंतपण' या नांव ॥८८॥

गज उपडिजे पायीं धरून । घायीं चूर कीजे पंचानन ।

प्राण न जिंकतां जाण । शूरांचें प्रमाण नव्हे बळ ॥८९॥

प्राणाअधीन जीव मन । त्या प्राणाचें करूनि दमन ।

तो स्वयें कीजे गा स्वाधीन । `अतिबळ' जाण या नांव ॥४९०॥

दृढ प्राणायाम साधिल्यापाठीं । थोरला देवो धांवे भेटी ।

भेटलिया न सुटे मिठी । ऐसा `बळी' सृष्टीं प्राणायामी ॥९१॥