श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

N/A

मूर्खो देहाद्यहंबुद्धीः पन्था मन्निगमः स्मृतः ।

उत्पथश्चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥४२॥

वेदशास्त्र नेणता एक । त्यासी मूर्ख म्हणती लोक ।

ते मूर्खता येथें न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥२२॥

केवळ नश्वर देह देख । तो मी म्हणोनि मानी हरीख ।

देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥२३॥

विटाळें देहाचा संभवो । विटाळें देहाचा उद्‍भवो ।

विटाळेंचि निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशीं ॥२४॥

देहाचें निजरूप येथ । अस्थि चर्म विष्ठा मूत्र ।

तो मी म्हणवूनि जो श्लाघत । `मूर्ख' निश्चित तो जाण ॥२५॥

ऐशी जे कां देह‍अहंता । ती नांव परममूर्खता ।

चालणें माझ्या वेदपंथा । `सन्मार्गता' ती नांव ॥२६॥

ज्यासी जाहली चित्तविक्षेपता । तो निंदी गुरुदेवता ।

जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजीं पडे ॥२७॥

जो गुरुदोषदर्शी समत्सरता । जो क्रोध करी सुहृदआप्तां ।

जो धिक्कारी मातापिता । `चित्तविक्षेपता' त्या नांव ॥२८॥

जो सन्मानालागीं पाही । साधुसज्जनांतें करी द्रोही ।

जो दोष देखे ठायीं ठायीं । `चित्तविक्षेप' पाहीं या नांव ॥२९॥

जो वदे परापवादा । जो करूं रिघे परनिंदा ।

जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । `चित्तविक्षेपबाधा' । ती नांव ॥५३०॥

जो सन्मार्गापासूनि चेवता । पडे अधर्म‍अकर्म‍उत्पथा ।

तेही `चित्तविक्षेपता' । जाण तत्त्वतां उद्धवा ॥३१॥

आपण तत्त्वतां परब्रह्म । जाणणें हा `वेदमार्ग' उत्तम ।

हें नेणोनि वर्तणें सकाम । तोचि परम `उन्मार्ग' ॥३२॥

स्वर्गशब्दाची व्युप्तत्ती । ते सत्त्वगुणाची उत्पत्ती ।

जेणें निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकगति तो स्वर्ग नोहे ॥३३॥

अमरभुवना जे जे गेले । ते परतोनि पतना आले ।

शुद्धसत्त्वीं जे मिसळले । ते पावले निजसुख ॥३४॥

ऐसा जो कां सत्त्वगुण । तोचि येथें `स्वर्ग' जाण ।

आतां नरकाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥३५॥