श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


आरंभ

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुरु चित्समुद्रा । मुक्तमोतियांचा तुजमाजीं थारा ।

ज्ञानवैराग्यशुक्तिद्वारा । सभाग्य नरा तूं देशी ॥१॥

तुझी खोली अमर्याद । माजीं चिद्रत्‍नें अतिविविध ।

देखोनि निजप्रबोधचांद । भरतें अगाध तुज दाटे ॥२॥

उलथल्या स्वानंदभरत्यासी । गुरुआज्ञा-मर्यादा नुल्लंघिसी ।

तेथ निजभक्ति हें तारुं थोर । त्यासी वागवितां तूं कर्णधार ।

प्रेमाचें साचार चढविशी शीड ॥४॥

तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार ।

त्यांची मागुती येरझार । सत्य साचार खुंटली ॥५॥

एक लावूनि कासेसी । भवसागरीं वागविशी ।

बुडण्याचें भय त्यासी । महाकल्पेंसीं बाधीना ॥६॥

एक बुडाले भक्तिसमरसीं । ते घातले शेषशयनापाशीं ।

एक बैसविले अढळतेसी । ते ब्रह्मादिकांसी न ढळती ॥७॥

तुझ्या सागरत्वाची परी । विजातीय तिळभरी ।

राहों नेदिसी भीतरीं । हे अगाध थोरी पैं तुझी ॥८॥

अत्यंतप्रळयीं जैं हा चढे । तैं ’संसार’ हें नांवहि बुडे ।

वैकुंठकैलासावरता वाढे । मागें पुढें हाचि हा ॥९॥

ऐशिया सद्गुरुसमुद्रोदकीं । एका एकपणें हरीत कीं ।

भीतरीं पडतां आवश्यकीं । अंगीकारी कीं जनार्दन ॥१०॥

तो जनार्दन स्वयें देखा । एकादशाची करी टीका ।

तेणें अभंगीं घालूनि एका । कवित्व लोकां ऐकवी ॥११॥

जनार्दना आवडे एक । तो मी एका भेटतांचि देख ।

निजात्मभावें पडिलें ऐक्य । आपुलें निजसुख भोगवी ॥१२॥

बोलवी निजसुखाची कथा । त्यासी आपणचि होय श्रोता ।

मग अर्थाच्या यथार्थतां । समाधानता देतसे ॥१३॥

यापरी गा जनार्दनें । एकादश मर्‍हाटा करणें ।

नव्हे माझे युक्तीचें बोलणें । हें स्वयें सज्ञानें जाणिजेल ॥१४॥

त्या एकादशाची गतकथा । एकोणिसावा संपतां ।

गुणदोषांची कांहीं वार्ता । उद्धवासी तत्त्वतां सांगीतली ॥१५॥

गुणदोष जो देखणें । तोचि महादोष जाणणें ।

गुणदोष स्वयें न देखणें । तो गुण म्यां श्रीकृष्णें मानिजे ॥१६॥

हें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर ।

काय गुणदोषांचा विचार । घरोघर लोकीं केला ॥१७॥

तुम्हींच वेदमुखें आपण । प्रकटिलें गुणदोषलक्षण ।

तें तुमचें वेदवचन । केवीं अमान्य करावें ॥१८॥

ऐसें विधिनिषेधलक्षण । विचारितां तें वेदवचन ।

कां पां निषेधी श्रीकृष्ण । उद्धव तो प्रश्न स्वयें पुसे ॥१९॥

विसावे अध्यायीं निरुपण । सांगावया गुणदोषलक्षण ।

भक्ति ज्ञान कर्म जाण । तिन्ही अधिकार भिन्न सांगेल ॥२०॥

उद्धव म्हणे हे श्रीकृष्ण । तूं वेदरुपें आपण ।

बोलिलासी दोषगुण । तें परम प्रमाण आम्ही मानूं ॥२१॥

हा विधि हा निषेध । हें दाविताहे तुझा वेद ।

तो वेदानुवाद विशद । ऐक प्रसिद्ध सांगेन ॥२२॥