श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

अस्मिंल्लोके वर्तमानः, स्वधर्मस्थोऽनघः शुचिः ।

ज्ञान विशुद्धमाप्नोति, मद्भक्तिं वा यदृच्छया ॥११॥

असतां ये लोकीं वर्तमान । ऐसें करितां स्वधर्माचरण ।

होय पुण्यपापांचें निर्दळण । निर्मळत्वें जाण तो अतिपवित्र ॥१६॥

तेथ निरसोनि भवभान । प्रकाशे माझें शुद्ध ज्ञान ।

कां सप्रेम माझें भजन । ’पराभक्ति’ जाण तो लाहे ॥१७॥

जे भक्तीमाजीं मी आपण । सदा होय भक्ताअधीन ।

तेथ मोक्षासहित ज्ञान । येऊनि आपण पायां लागे ॥१८॥

ऐक ज्ञानाचा परिपाक । संसारा नांव ’महादुःख’ ।

मोक्ष तो म्हणे ’परमसुख’ । मद्भक्त देख दोनी न मनी ॥१९॥

सप्रेम करितां माझें भजन । नाठवे भवभयबंधन ।

तेथ मोक्षासी पुसे कोण । मद्भक्तां भक्तीचा पूर्ण उल्हास ॥१२०॥

ज्यातें म्हणती ’महादुःख’ । तें भक्तांसी भगवद्रूप देख ।

ज्यातें म्हणती ’परमसुख’ । तेंही आवश्यक भगवंत ॥२१॥

यापरी भक्त माझ्या भजनीं । विसरला सुखदुःखें दोनी ।

मी एकु भगवंतूवांचूनी । आन त्रिभुवनीं देखेना ॥२२॥

ऐशी माझी भक्ति पूर्ण । साधूनि आणितां न ये जाण ।

जैं मी भगवंत होय प्रसन्न । तैं यदृच्छा जाण हे भक्ति लाभे ॥२३॥

मी कैसेनि होय प्रसन्न । ऐसें कल्पील तुझें मन ।

तेथ नरदेह गा कारण । माझे प्रसन्नपण व्हावया ॥२४॥