श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं, प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ।

मयानुकूलेन नभस्वतेरितं, पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥१७॥

चौर्‍यायशीं लक्ष जीवयोनी । त्यांत मनुष्यदेहावांचूनी ।

अधिकारी ब्रह्मज्ञानीं । आन कोणी असेना ॥६६॥

जेणें देहें होय माझी प्राप्ती । यालागीं ’आद्य देहो’ यातें म्हणती ।

याची दुर्लभ गा अवाप्ती । भाग्यें पावती नरदेह ॥६७॥

’सदृढ’ म्हणजे अव्यंग । ’अविकळ’ म्हणजे सकळ भाग ।

नव्हे बहिरे मुके अंध पंग । सर्वांगें साङग संपूर्ण ॥६८॥

भरतखंडीं नरदेहप्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती ।

तेथही विवेकु परमार्थी । त्याचा वशवर्ती मी परमात्मा ॥६९॥

मी परमात्मा जेथ वशवर्ती । तेथ सुरनरांचा केवा किती ।

परी हा देह न लभे पुढती । दुर्लभ प्राप्ती नरदेहा ॥१७०॥

जोखितां पुण्यपाप समान । तैं नरदेहाची प्राप्ती जाण ।

तें पुढती पावावया आपण । जोखूनि कर्माचरण कोणी न करी ॥७१॥

पुण्य झालिया अधिक । स्वर्ग भोगणें आवश्यक ।

पापाचें वाढल्या तुक । भोगावे नरक अनिवार ॥७२॥

ऐशी कर्माची गति गहन । एथ काकतालीयन्यायें जाण ।

अचवटें लाभे माणुसपण । भवाब्धितारण महातारुं ॥७३॥

’सुलभ’ म्हणिजे अविकळ । ’सकल्प’ म्हणिजे विवेकशीळ ।

यासी वागविता केवळ । नावाडा अति कुशळ गुरु कर्णधार ॥७४॥

कानीं निजगुज उपदेशिता । यालागीं गुरु ’कर्णधार’ म्हणती तत्त्वतां ।

कानीं धरितांचि उद्धरी भक्तां । यालागीं सर्वथा गुरु कर्णधार ॥७५॥

भवाब्धीमाजीं नरदेह तारुं । तेथ सद्गुरु तोचि कर्णधारु ।

त्यासी अनुकूल वायु मी श्रीधरु । भवाब्धिपरपारु पावावया ॥७६॥

कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आंदोळ ।

चुकवूनि विकल्पाचे कल्लोळ । साम्यें पाणिढाळ सवेग काढी ॥७७॥

लावूनि विवेकाचें आवलें । तोडिती कर्माकर्मांचीं जळें ।

भजनशिडाचेनि बळें । नाव चाले सवेग ॥७८॥

कामक्रोधादि महामासे । तळपती घ्यावया आमिषें ।

त्या घालूनि शांतिचेनि पाशें । तारुं उल्हासें चालवी ॥७९॥

ठाकतां सारुप्यादि बंदरें । तारुवामाजीं अतिगजरें ।

लागलीं अनुहाताचीं तुरें । जयजयकारें गर्जती ॥१८०॥

नेतां सलोकतेचे पेंठे । तारुं उलथेल अवचटें ।

लावितां समीपतेचे वाटे । तारुं दाटे दोंही सवां ॥८१॥

करावें सरुपतेमाजीं स्थिरु । तंव तो दाटणीचा उतारु ।

ऐसा जाणोनियां निर्धारु । लोटिलें तारुं सायुज्यामाजीं ॥८२॥

ते धार्मिकाची धर्मपेंठ । नाहीं सुखसारा खटपट ।

वस्तु अवघीच चोखट । घ्यावी एकवट संवसाटी ॥८३॥

ऐसें दुर्लभ नरदेहाचें तारुं । जेथ मी श्रीगुरुरुपें कर्णधारु ।

येणें न तरेच जो संसारु । तो जाणावा नरु आत्महंता ॥८४॥

नरदेह वेंचिलें विषयांसाठीं । पुढें नरक भोगावया कल्पकोटी ।

तरी आपुलेनि हातें निजपोटीं । शस्त्र दाटी स्वयें जेवीं ॥८५॥

परपारा अवश्य आहे जाणें । तेणें नाव फोडूनि भाजिजे चणे ।

कां पांघरुणें जाळूनि तापणें । हिंवाभेणें सुज्ञांनीं ॥८६॥

तैसें येथ झालें गा साचार । थित्या नरदेहा नागवले नर ।

पुढां दुःखाचे डोंगर । अतिदुस्तर वोढवले ॥८७॥

सकळ योनीं विषयासक्ती । सर्वांसी आहे निश्चितीं ।

नरदेहीं तैशीच विषयस्थिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥८८॥

पावोनि श्रेष्ठ नरशरीर । जो नुतरेचि संसारपार ।

तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥८९॥

कोटी ब्रह्महत्या-गोहत्यांसी । प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेंसीं ।

परी आत्महत्या घडे ज्यासी । प्रायश्चित्त त्यासी असेना ॥१९०॥

जो आत्महत्या करुनि निमाला । तो मरतांचि नरकासी गेला ।

प्रायश्चित्तासी कोण आहे उरला । मा शास्त्रार्थें बोला बोलावें ॥९१॥

अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेहीं भोगु भोगविला ।

हा थोर नाड जीवासी झाला । विसरोनि आपुला निजस्वार्थ ॥९२॥

लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्तीं नर ।

नरकीं बुडाले अपार । हें शार्ङगधर बोलिला ॥९३॥

असोत या मूर्खांचिया गोठी । ऐक उत्तमांची हातवटी ।

जे वेदार्थपरिपाठीं । निजहितदृष्टी सावध ॥९४॥

अतिविरक्त जे स्वभावें । तिंहीं काय कर्तव्य करावें ।

कोणा अर्थातें त्यजावें । तेंचि देवें सांगिजे ॥९५॥