श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

मनोगतिं न विसृजेज्जितप्राणो जितेन्द्रियः ।

सत्त्वसंपन्नया बुद्ध्‌या, मन आत्मवशं नयेत् ॥२०॥

मोकळें न सोडून मन । न सोडूनि अनुसंधान ।

करावें अन्नपानशयन । हें विषयदान निजहिता ॥७॥

साधकें साधूनि आपण । जरी जिंतिले इंद्रियप्राण ।

तरी मोकळें सोडूं नये मन । स्वरुपीं नेहटून राखावें ॥८॥

जो मनासी विश्वासला । तो कामक्रोधीं नागवला ।

संकल्पविकल्पीं लुटिला । विसंचिला महामोहे ॥९॥

जाणोनि मनाचें महाबळ । त्यासी विवेक द्यावा मोकळ ।

तो हालों नेदी केवळ । करी निश्चळ निजांगें ॥२१०॥

मनाविवेकाचे उभयसंधीं । सत्त्वसंपन्न होय बुद्धी ।

ते विषयांचे कंद छेदी । तोडी उपाधी सविकार ॥११॥

मन जेथ जेथ पळोनि जाये । तेथ तेथ विवेक उभा राहे ।

मग सत्त्वबुद्धीचेनि साह्यें । मोडी पाये मनाचे ॥१२॥

ऐसें मनाचें खुंटलिया बळ । मग स्वरुपीं होय निश्चळ ।

जेवीं जळगार केवळ । ठाके गंगाजळ वस्तीसी ॥१३॥

यापरी स्वरुपीं मन । स्वयें पावे समाधान ।

तोचि योग परम पावन । समाधान जीवशिवां ॥१४॥

जीवपरमात्म्याची एकात्मता । तोच ’परमयोग’ तत्त्वतां ।

येचिविखींची कथा । अश्वदृष्टांता हरि सांगे ॥१५॥