श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २५ वा

यदि कुर्यात् प्रमादेन, योगी कर्म विगर्हितम् ।

योगेनैव दहेदंहो, न्यायत्तत्र कदाचन ॥२५॥

भक्तासी निंद्य कर्म न घडे । त्यासी मी राखता मागें पुढें ।

हें आलें गा योग्याकडे । तेथही घडे प्रमादें ॥९५॥

प्रमादें घडलें जें पाप । त्याचा तीव्र अनुताप ।

जेवीं दावाग्नीं पोळल्या सर्प । तैसा संकप पापासी ॥९६॥

गोमाशी लागतां सिंहासी । तो जेवीं झाडी सर्वांगासी ।

तेवीं योगी देखोनि पापासी । जो अहर्निशीं अनुतापी ॥९७॥

तेणें होऊनि सावचित्त । योगबळें निजयोगयुक्त ।

पाप निर्दाळावें समस्त । हेंचि प्रायश्चित्त योगियासी ॥९८॥

हे सांडोनियां योगस्थिती । जैं लावूं धांवे शेणमाती ।

तैं नागवला गा निश्चितीं । नव्हेचि निष्कृती पापाची ॥९९॥

हृदयीं नाहीं अनुतापवृत्ती । वरिवरी गा शास्त्रोक्तीं ।

लावूं जातां शेणमाती । नव्हे निवृत्ती पापाची ॥३००॥

माझें क्षणार्ध अनुसंधान । कोटि कल्मषां करी दहन ।

तेथ इतरांचा केवा कोण । हें स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥१॥

ज्याचे अधिकारीं माझें ध्यान । सांडोनियां जाण ।

प्रायश्चित्त सांगतां आन । लागे दूषण सांगत्यासी ॥२॥;

यालागीं मुख्यत्वें जाण । येथ अधिकारचि प्रमाण ।

येचिविखींचें निरुपण । श्रीनारायण सांगत ॥३॥