श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २८ वा

ततो भजेत मां प्रीतः, श्रद्धालुर्दृढनिश्चयः ।

जुषमाणश्च तान्कामान्दुःखोदर्कांश्च गर्हयन् ॥२८॥

त्यागावया नाहीं सामर्थ्यशक्ती । त्यासी विषयभोग जेव्हां येती ।

ते भोगी ऐशिया रीतीं । जेवीं श्रृंगारिती सुळीं द्यावया ॥४६॥

त्यांसी केळें साखर चोखटी । दूधतूप लावितां ओंठीं ।

शूळ भरेल या भोगापाठीं । तो धाक पोटीं धुकधुकी ॥४७॥

तेवीं विषय भोगितां जाण । पुढें निरय अतिदारुण ।

मज कां विसरला नारायण । मधुसूदन माधव ॥४८॥

मी पडिलों विषयबंदिखानीं । वेगीं पावें गरुडा वळंघोनी ।

कृपाळुवा चक्रपाणी । मजलागोनी सोडवीं ॥४९॥

विषयमहाग्रहाचे तोंडीं । मी सांपडलों बडिशपिंडी ।

गजेंद्राचेपरी तांतडीं । घालीं उडी मजलागीं ॥३५०॥

धांव पाव गा गोविंदा । निवारीं माझी विषयबाधा ।

उपेक्षूं नको मुकुंदा । घेऊनि गदा धांव वेगीं ॥५१॥

तूं अडलियांचा सहाकारी । भक्तकाजकैवारी ।

मज बुडतां विषयसागरीं । वेगें उद्धरीं गोविंदा ॥५२॥

मी पडिलों विषयसागरीं । बुडविलों कामलोभलहरीं ।

क्रोधें विसंचिलों भारी । अभिमानसुसरीं गिळियेलों ॥५३॥

तूं दीनदयाळ श्रीहरी । हें आपुलें बिरुद साच करीं ।

मज दीनातें उद्धरीं । निजबोधकरीं धरोनियां ॥५४॥

हे विषयबाधा अतिगहन । कां पां न पवे जनार्दन ।

येणें अट्टाहासें जाण । करी स्मरण हरीचें ॥५५॥

न सुटे विषयवज्रमिठी । पडिलों कामदंष्ट्रांचिये पोटीं ।

कांहीं केलिया न सुटे मिठी । आतां जगजेठी धांव वेगीं ॥५६॥

ऐसा निजभक्तांचा धांवा । क्षणही मज न साहवे उद्धवा ।

माझी कृपा होय तेव्हां । पूर्ण स्वभावा अनुतापें ॥५७॥

उद्धवा जेथ अनुताप नाहीं । तेथ माझी कृपा नव्हे कहीं ।

कृपेचें वर्म हेंच पाहीं । जैं अनुताप देहीं अनिवार ॥५८॥

माझे कृपेवीण निश्चितीं । कदा नुपजे माझी भक्ती ।

माझी झालिया कृपाप्राप्ती । अनन्यभक्ती तो करी ॥५९॥

माझे कृपेचें लक्षण । प्राप्त विषय भोगितां जाण ।

न तुटे माझें अनन्य भजन । ’पूर्ण कृपा’ जाय या नांव ॥३६०॥

मग चढत्या वाढत्या प्रीतीं । नीच नवी करी माझी भक्ती ।

देह गेह स्त्री पुत्र संपत्ती । वेंची माझे प्रीतीं धनधान्य ॥६१॥

माझे भक्तीलागीं आपण । सर्वस्व वेंची हें नवल कोण ।

स्वयें वंचीना जीवप्राण । ऐसें अनन्यभजन सर्वदा ॥६२॥

माझ्या भजनाची अतिप्रीती । स्मरण न सांडी अहोरातीं ।

माझा विसर न पडे चित्तीं । त्याची फळप्राप्ती हरि सांगे ॥६३॥