श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३७ वा

एवमेतान्मयादिष्टाननुतिष्ठन्ति मे पथः ।

क्षेमं विन्दन्ति मत्स्थानं, यद्ब्रह्म परमं विदुः ॥३७॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कन्धे विंशतितमोऽध्यायः ॥२०॥

उद्धवा यापरी जाण । म्यां वेदवादें आपण ।

उपदेशिले गा जन । भक्तिज्ञानकर्मयोगें ॥२६॥

कर्मेंचि कर्में छेदिजेती । ऐशी ’कर्मयोगाची’ गती ।

स्वधर्मकर्में माझी प्राप्ती । ते म्यां तुजप्रती सांगितली ॥२७॥

नित्यानित्यविवंचन । करुनि अनित्यनिर्दळण ।

हें ’ज्ञानयोगाचें’ लक्षण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥२८॥

तैशीच करितां ’माझी भक्ती’ । सकळ फळें पायां लागती ।

भक्तांसी अनायासें माझी प्राप्ती । हेंही तुजप्रती सांगितलें ॥२९॥

अधिकारभेदेंसीं साङग । त्रिकांड त्रिविध वेदमार्ग ।

माझे प्राप्तीलागीं चांग । विशद विभाग म्यां केले ॥४३०॥

म्यां सांगितल्याऐसें जाण । जो वेदमार्गें करी अनुष्ठान ।

तो माझी प्राप्ती पावे संपूर्ण । सगुण निर्गुण यथारुची ॥३१॥

सगुणसाक्षात्कार जो येथ । तें पंचरात्रागम-मत ।

वैकुंठचि मुख्य म्हणत । हें मत निश्चित तयांचें ॥३२॥

सप्तावरणांबाहेरी । मायावरणाभीतरीं ।

वैकुंठ रचिलें श्रीहरीं । हें बोलिजे निर्धारीं वेदान्तीं ॥३३॥

तेथ आगमाचें मनोगत । माया ते ’भगवल्लीला’ म्हणत ।

स्वलीला वैकुंठ रची भगवंत । क्षयो तेथ असेना ॥३४॥

जेथ लीलाविग्रही मेघश्याम । स्वयें वसे पुरुषोत्तम ।

तेथ नाहीं गुण काळ कर्म । मायादि भ्रम रिघेना ॥३५॥

एवं जन्मक्षयातीत । वैकुंठ अक्षयी निज नित्य ।

तेथ पावले ते नित्यमुक्त । हें ’आगम-मत’ उद्धवा ॥३६॥

मंत्रें आराध्यदैवतें प्रसन्नें । हें वेदार्थियांचें बोलणें ।

तें म्यां तुजप्रती अनुसंधानें । बोलिलों जाणें उद्धवा ॥३७॥

भावाथभक्तीचें लक्षण । ते प्रसन्नतेची खूण ।

हें पूर्वीं केलें निरुपण । निरुतें जाण उद्धवा ॥३८॥

ये अर्थीं वेदांती म्हणत । अत्यंतप्रळयींचा जो आघात ।

तो वैकुंठकैलासादि समस्त । साकारवंत निर्दाळी ॥३९॥

ते काळींचें उर्वरित । केवळ जें गुणातीत ।

तें पूर्ण ब्रह्म सदोदित । जाण निश्चित उद्धवा ॥४४०॥

जेथ काळ ना कर्म । जेथ गुण ना धर्म ।

जेथ माया पावे उपरम । तें परब्रह्म उद्धवा ॥४१॥

माझें स्थान वैकुंठ जाण । तेथील प्राप्ति ’सायुज्य-सगुण’।

’पूर्ण-सायुज्यता’ संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण सदोदित ॥४२॥

पावावया पूर्ण परब्रह्म । साधकांसी कोणे मार्गीं क्षेम ।

वेदोक्त मद्भक्ति सुगम । उत्तमोत्तम हा मार्ग ॥४३॥

आणिके मार्गीं जातां जाण । कामलोभादि उठे विघ्न ।

कां बुडवी ज्ञानाभिमान । ये नागवण प्रत्यवायाची ॥४४॥

तैसें नाहीं भक्तिपंथीं । सवें नवविध सांगाती ।

चढता पाउलीं अतिविश्रांती । भजनयुक्ती मद्भावें ॥४५॥

येथील मुख्यत्वें साधन । गेलियाही जीवप्राण ।

कदा न देखावे दोषगुण । तैं ब्रह्म परिपूर्ण पाविजे ॥४६॥

जेथ नाहीं भयभ्रांती । जेथ नाहीं दिवसराती ।

जेथ नाहीं शिवशिवस्थिती । तें ब्रह्म पावती मद्भक्त ॥४७॥

जेथ नाहीं रुपनाम । जेथ नाहीं काळकर्म ।

जेथ नाहीं मरणजन्म । तें परब्रह्म पावती ॥४८॥

जेथ नाहीं ध्येयध्यान । जेथ नाहीं ज्ञेयज्ञान ।

जेथ नाहीं मीतूंपण । तें ब्रह्म परिपूर्ण पावती ॥४९॥

ज्यासी नाहीं मातापिता । जें नव्हे देवोदेवता ।

जें बहु ना एकुलता । तें ब्रह्म तत्त्वतां पावती ॥४५०॥

जेथ नाहीं वर्णाश्रम । जेथ नाहीं क्रियाकर्म ।

जेथ नाहीं मायाभ्रम । तें परब्रह्म पावती ॥५१॥

जें गुणागुणीं अतीत । जें लक्ष्यलक्षणारहित ।

जें स्वानंदें सदोदित । ते ब्रह्म प्राप्त मद्भक्तां ॥५२॥

पूर्णकृपेचा हेलावा । न संठेचि देवाधिदेवा ।

तो हा एकाद्शींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५३॥

जेथ ठावो नाहीं देहभावा । जेथ सामरस्य जीवशिवां ।

तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५४॥

जेथ उगाणा होय अहंभावा । जेथ शून्य पडे मायेच्या नांवा ।

तो हा एकदशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५५॥

जेथ देवभक्तांचा कालोवा । एकत्र होय आघवा ।

तो हा एकादशीं विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५६॥

कष्टीं स्वानंद स्वयें जोडावा । त्या स्वानंदाचा आइता ठेवा ।

तो हा एकादशीं विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५७॥

करोनि भेदाचा नागोवा । होय अभेदाचा रिगावा ।

तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥५८॥

काढोनि भावार्थाचा भावो । सोलीव सोलिवांचा सोलावो ।

गाळुनी गाळिवांचा भक्तिभावो । उद्धवासी देवो देतसे ॥५९॥

यापरी श्रीकृष्णनाथ । होऊनियां स्वानंदभरित ।

विसाव्या अध्यायींची मात । हरिखें सांगत उद्धवा ॥४६०॥

आतां विसाव्याचा विसावा । स्वानंदसुखाचा हेलावा ।

तो मी सांगेन एकविसावा । ऐक उद्धवा सादर ॥६१॥

वेदीं शुद्धाशुद्धलक्षण । हें पुढिले अध्यायीं निरुपण ।

एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥६२॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे

एकाकार-टीकायां वेदत्रयीविभागयोगो नाम विंशतितमोऽध्यायः ॥२०॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

(अध्याय ॥२०॥श्लोक॥३७॥ओंव्या॥४६२॥एकूण ग्रंथ ४९९)

विसावा अध्याय समाप्त