श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १ ला

श्रीभगवानुवाच -

य एतान्मत्पथो हित्वा भक्तिज्ञानक्रियात्मकान् ।

क्षुद्रान्कामांश्चलैः प्राणैर्जुषन्तः संसरन्ति ते ॥१॥

म्यां सांगितले जे विभाग । भक्तिज्ञानक्रियायोग ।

हा सांडूनि शुद्ध वेदमार्ग । सकाम भोग जे वांछिती ॥२९॥

क्षणभंगुर देहाचा योग । हें विसरोनियां चांग ।

सकाम कर्माची लगबग । भवस्वर्गभोग भोगावया ॥३०॥

चळतेनि प्राणसंगें । देहातें काळ ग्रासूं लागे ।

येथ नानाकर्मसंभोगें । मूर्ख तद्योगें मानिती सुख ॥३१॥

भोगितां कामभोगसोहळे । नेणे आयुष्य ग्रासिलें काळें ।

मग जन्ममरणमाळें । दुःख‍उमाळे भोगिती ॥३२॥

काम्य आणि नित्यकर्म । आचरतां दिसे सम ।

तरी फळीं कां पां विषम । सुगम दुर्गम परिपाकु ॥३३॥

तें कर्मवैचित्र्यविंदान । संकल्पास्तव घडे जाण ।

तेचि अर्थींचें निरूपण । जाणोनि श्रीकृष्ण सांगत ॥३४॥