श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २ रा

स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुणः परिकीर्तितः ।

विपर्ययस्तु दोषः स्यादुभयोरेषे निश्चयः ॥२॥

कर्म विचारितां अवघें एक । परी अधिकारी भिन्नभिन्न देख ।

ते मी सांगेन आवश्यक । जेणें सुखःदुख भोगणें घडे ॥३५॥

मुखाचा व्यापार भोजन । तो नाकें करूं जातां जाण ।

सुख बुडवूनि दारुण । दुःख आपण स्वयें भोगी ॥३६॥

कां पायांचें जें चालणें । पडे जैं डोईं करणें ।

तैं मार्ग न कंठे तेणें । परी कष्टणें अनिवार ॥३७॥

तेवीं जें कर्म स्वाधिकारें । सुखातें दे अत्यादरें ।

तेचि कर्म अनधिकारें । दुःखें दुर्धरे भोगवी ॥३८॥

गजाचें आभरण । गाढवासी नव्हे भूषण ।

परी भारें आणी मरण । तेवीं कर्म जाण अनधिकारीं ॥३९॥

मेघ वर्षे निर्मळ जळ । परी जैसें बीज तैसें फळ ।

एका भांगी पिके सबळ । एका प्रबळ साळी केळें ॥४०॥

पाहें पां जैसें दुग्ध चोख । ज्वरितामुखीं कडू विख ।

तेंचि निरुजां गोड देख । पुष्टिदायक सेवनीं ॥४१॥

तेवीं सकामीं कर्म घडे । ते बाधक होय गाढें ।

तेंचि कर्म निष्कामाकडे । मोक्षसुरवाडें सुखावी ॥४२॥

स्वाधिकारें स्वकर्माचरण । तोचि येथें मुख्यत्वें गुण ।

अनधिकारीं कर्म जाण । तोचि अवगुण महादोष ॥४३॥

या रीतीं गा कर्माचरण । उपजवी दोष आणि गुण ।

हेंचि गुणदोषलक्षण । शास्त्रज्ञ जाण बोलती ॥४४॥

तेंचि गुणदोषलक्षण । शुद्ध्यशुद्धींचें कारण ।

तेचि अर्थींचें विवंचन । देवो आपण सांगत ॥४५॥