श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४ था

धर्मार्थं व्यवहारार्थं यात्रार्थमिति चानघ ।

दर्शितोऽयं मयाऽऽचारो धर्ममुद्वहतां धुरम् ॥४॥

उद्धवा तूं निष्पाप त्रिशुद्धी । यालागीं तुझी शुद्ध बुद्धी ।

धर्मादि व्यवहारसिद्धी । ऐक तो विधि सांगेन ॥५२॥

करितांही धर्माचरण । प्रवृत्तिधर्म तो अप्रमाण ।

निवृत्तिधर्म तो अतिशुद्ध जाण । हे दोषगुण स्वधर्मीं ॥५३॥

जो व्यवहार विषयासक्तीं । ते अशुद्ध व्यवहारस्थिती ।

जे परोपकारप्रवृत्ती । तो व्यवहार वंदिती सुरनर ॥५४॥

अद्रुष्टदाता ईश्वर । हें विसरोनि उत्तम नर ।

द्रव्यलोभें नीचांचे दारोदार । हिंडणें अपवित्र ते यात्रा ॥५५॥

आळस सांडोनि आपण । करूं जातां श्रवण कीर्तन ।

कां तीर्थयात्रा साधुदर्शन । पूजार्थ गमन देवालयीं ॥५६॥

कां अनाथप्रेतसंस्कार । करितां पुण्य जोडे अपार ।

पदीं कोटियज्ञफळसंभार । जेणें साचार उपजती ॥५७॥

जेणें पाविजे परपार । तिये नांव यात्रा पवित्र ।

हा यात्रार्थसंचार । गुणदोषविचार वेदोक्त ॥५८॥

राजा निजपादुका हटेंसीं । वाहवी ब्राह्मणाचे शिसीं ।

तो दोष न पवे द्विजासी । स्वयें सदोषी होय राजा ॥५९॥

जेवीं आपत्काळबळें जाण । पडतां लंघनीं लंघन ।

तैं घेऊनि नीचाचें धान्य । वांचवितां प्राण दोष नाहीं ॥६०॥

तेंचि नीचाचें दान । अनापदीं घेतां जाण ।

जनीं महादोष दारुण । हेंही जाण वेदोक्त ॥६१॥

जे कर्मधर्मप्रवर्तक शुद्ध । मनुपराशरादि प्रसिद्ध ।

तिंहीं गुणदोष विविध । शुद्धाशुद्ध बोलिले ॥६२॥

तेंचि शुद्धाशुद्धनिरूपण । तीं श्लोकीं नारायण ।

स्वयें सांगताहे आपण । गुणदोषलक्षणविभाग ॥६३॥