श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १२ वा

धान्यदार्वस्थितन्तूनां रसतैजसचर्मणाम् ।

कालवाय्वग्निमृत्तोयैः पार्थिवानां युतायुतैः ॥१२॥

शूद्रप्रतिग्रहाचें धान्य । एकरात्रीं शुद्ध जाण ।

स्त्रुक्स्त्रुवादिकाष्ठभाजन । जलप्रक्षालनें शुद्धत्व ॥३७॥

व्याघ्रनख गजदंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ।

जेव्हा होती स्नेहतीत । अतिपूनीत ते काळीं ॥३८॥

पट्टतंतु स्वयें पुनीतु । वायूनें शुद्ध ऊर्णातंतु ।

वस्त्रतंतु जळाआंतु । होय पुनीतु प्रक्षाळिल्या ॥३९॥

गोक्षीर पवित्र कांस्यमृत्पात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं ।

ताम्र पवित्र आम्लेंकरीं । आम्ल लवणांतरीं पवित्र ॥१४०॥

घृत पवित्र अग्निसंस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्रीं ।

ब्राह्मण पवित्र स्वाचारीं । पवित्रता आचारीं वेदविधीं ॥४१॥

वेद पवित्र गुरुमुखें । गुरु पवित्र निजात्मसुखें ।

आत्मा पवित्र गुरुचरणोदकें । पवित्र उदकें द्विजचरणीं ॥४२॥

पृथ्वी पवित्र जळसंस्कारीं । जळ पवित्र पृथ्वीवरी ।

चर्म पवित्र तैलेंकरीं । तेल चर्मपात्रीं पवित्र ॥४३॥

व्याघ्रादि जें मृगाजिन । इयें स्वभावें पवित्र जाण ।

अग्निसंस्कारें सुवर्ण । पवित्रपण स्वभावें ॥४४॥

एवं इत्यादि परस्परीं । शुचित्व बोलिलें स्मृतिशास्त्रीं ।

आतां मळलिप्त झालियावरी । त्यांचेही अवधारीं शुचित्व ॥४५॥