श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १५ वा

मंत्रस्य च परिज्ञानं कर्मशुद्धिर्मदर्पणम् ।

धर्मः संपद्यते षड्‌भिरधर्मस्तु विपर्ययः ॥१५॥

मंत्रशुद्धि मंत्रार्थज्ञानें । कर्मशुद्धि ब्रह्मार्पणें ।

इयें कर्त्याचे शुद्धीकारणें । साही लक्षणें वेदु बोले ॥५५॥

देश-काळ-द्रव्यसंपन्नता । मंत्र-कर्म-निरुज कर्ता ।

या साहींच्या शुद्धावस्था । स्वधर्मता फलोन्मुख ॥५६॥

जें द्रव्य पावे दीनांचे आर्ता । कां माझिया निजभक्तां ।

या नांव `द्रव्यपवित्रता' । जाण तत्त्वतां निश्चित ॥५७॥

धर्मशास्त्रार्थें शुद्ध धन । कष्टें मिळवूनियां आपण ।

धनलोभीं ठेविल्या प्राण । अवघेंचि जाण अशुद्ध ॥५८॥

या नांव `द्रव्यशुद्धता' । ऐक मंत्राची पवित्रता ।

जेणें मंत्रें पाविजे मंत्रार्था । शुद्ध सर्वथा तो मंत्र ॥५९॥

जेथ केलिया मंत्रग्रहण । अंगीं चढता वाढे अभिमान ।

कां जेथ जारण-मारण-उच्चाटण । तें मंत्र जाण अपवित्र ॥१६०॥

या नांव `मंत्रशुद्धि' जाण । ऐक कर्माचें लक्षण ।

जेणें कर्में तुटे कर्मबंधन । तें कर्माचरण अतिशुद्ध ॥६१॥

स्वयें करितां कर्माचरण । जेणें खवळें देहाभिमान ।

कर्त्यासी लागे दृढ बंधन । तें कर्म जाण अपवित्र ॥६२॥

जेणें कर्में होय कर्माचा निरास । तें शुद्ध कर्म सावकाश ।

जेथ समबुद्धि सदा अविनाश । तो `पुण्यदेश' उद्धवा ॥६३॥

जरी सुक्षेत्रीं केला वास । आणि पराचे देखे गुणदोष ।

तो देश जाणावा तामस । अचुक नाश कर्त्यासी ॥६४॥

अन्य क्षेत्रीं देखिल्या दोष । त्याचा सुक्षेत्रीं होय नाश ।

सुक्षेत्रीं देखिल्या दोष । तो न सोडी जीवास कल्पांतीं ॥६५॥

जेथ उपजे साम्यशीळ । तो देश जाणावा निर्मळ ।

चित्त सुप्रसन्न जे वेळ । तो `पुण्यकाळ' साधकां ॥६६॥

स्वभावें शुद्ध ब्राह्ममुहूर्त । तेथही क्षोभल्या चित्त ।

तोही काळ अपुनीत । जाण निश्चित वेदार्थ ॥६७॥

येथ जो कां कर्मकर्ता । त्याची गेलिया कर्म‍अहंता ।

पुढें कर्म चाले स्वभावतां । हे `पवित्रता कर्त्याची' ॥६८॥

येथ जो म्हणे ` अहं कर्ता ' । तो पावे अतिबद्धता ।

हे कर्त्याची अपवित्रता । देह‍अहंता अभिमानें ॥६९॥

धर्मधर्माचे साही प्रकार । हें वेदार्थाचें तत्त्वसार ।

येही धर्मीं मुक्त होय नर । अधर्मीं अपवित्र अतिबद्ध ॥१७०॥

गुणदोषांचें लक्षण । सांगतां अतिगहन ।

येथ गुंतले सज्ञान । अतिविचक्षण पंडित ॥७१॥