श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १६ वा

क्कचिद्‍गुणोऽपि दोषः स्याद्दोषोऽपि विधिना गुणः ।

गुणदोषार्थनियमस्तद्‌भिदामेव बाधते ॥१६॥

ज्याचा मानिजे उत्तम गुण । तोचि दोष होय परतोन ।

एवं कर्मचि कर्मासी जाण । दोष दारुण उपजवी ॥७२॥

कर्मीं मुख्यत्वें गा आचमन । हें कर्मशुद्धीचें निजकारण ।

तेंचि दक्षिणाभिमुखें केल्या जाण । दोष दारुण उपजवी ॥७३॥

कानींची जेणें जाय तिडिक । तेंचि मुखीं घालितां देख ।

होय अत्यंत बाधक । प्राणांतिक अतिबाधा ॥७४॥

आचमनीं माषमात्र जीवन । घेतल्या होईजे पावन ।

तेंचि अधिक घेतां जाण । सुरापानसम दोष ॥७५॥

फणस खातां लागे गोड । तें जैं अधिक खाय तोंड ।

तैं शूळ उठे प्रचंड । फुटे ब्रह्मांड अतिव्यथा ॥७६॥

सूर्यपूजनीं पुण्य घडे । तेथ जैं बेलपत्र चढे ।

तैं पुण्य राहे मागिलीकडे । दोष रोकडे पूजकां ॥७७॥

ऐसा कर्मीं कर्मविन्यास । गुण तोचि करी दोष ।

कोठें दोषांचाही विलास । पुण्य बहुवस उपजवी ॥७८॥

चोराकुलितमार्गीं जाण । ब्राह्मण करितां प्रातःस्नान ।

तो नेतां कर्म त्यागून । दोषचि परी गुण गंभीर होय ॥७९॥

सर्पगरळेचें जीवन । ब्राह्मणें करितां प्राशन ।

तें पात्र घेतां हिरोन । दोषचि परी गुण गंभीर होय ॥१८०॥

गृहस्थासी अग्निहोत्र गुण । तोचि संन्याशासी अवगुण ।

ब्राह्मणीं विहीत वेदमंत्रपठण । शूद्रासी जाण तो दोष ॥८१॥

विषयनिवृत्तीलागीं सुगम । गुणदोषांचा केला नेम ।

हें नेणोनि वेदाचें वर्म । विषयभ्रम भ्रांतासी ॥८२॥

जंव भ्रांति तंव कर्मप्रवृत्ती । तेथ गुणदोषांची थोर ख्याती ।

जेवीं कां खद्योत लखलखिती । आंधारे रातीं सतेज ॥८३॥

तेवीं गुणदोषांमाजीं जाण । अवश्य अंगी आदळे पतन ।

तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८४॥