श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २६ वा

एवं व्यवसितं केचिदविज्ञाय कुवुद्धयः ।

फलश्रुतिं कुसुमितां न वेदज्ञा वदन्ति हि ॥२६॥

फलत्यागें स्वधर्मस्थिती । सर्वथा सकाम न करिती ।

यालागीं वेद बोले फलश्रुती । स्वधर्मप्रवृत्तीलागुनी ॥५८॥

सैंधव सागरा भेटूं जातां । जेवीं कां हारपे सैंधवता ।

तेवीं स्वधर्मीं प्रवर्ततां । सकामता उरेना ॥५९॥

जैशी दों दिव्यांची वाती । एकवट केलिया ज्योती ।

तेथ न दिसे भेदगती । पाहतां ज्योती एकचि ॥२६०॥

जेवीं अग्नीं कापुर मिळतां । तो अग्नीचि होय तत्त्वतां ।

तेवीं स्वधर्मकर्मीं प्रवर्ततां । कर्मीं निष्कर्मता स्वयें प्रकटे ॥६१॥

कर्माकर्मांची वेळुजाळीं । ते स्वधर्माचे कांचणिमेळीं ।

पडे नित्तशुद्धीची इंगळी । ते करी होळी कर्माकर्मांची ॥६२॥

सकामता करितां कर्म । स्वधर्म नाशी फळकाम ।

तेव्हां सकाम आणि निष्काम । दोंहींचें भस्म स्वधर्म करी ॥६३॥

जेवीं दों काष्ठांच्या घसणी । माजीं प्रकटे जो कां वन्ही ।

तो दोंहीतेंही जाळूनी । स्वतेजपणीं प्रकाशे ॥६४॥

तेवीं माझा वेदवादु । स्वकर्में छेदी कर्मबाधु ।

हें नेणोनि जे विषयांधु । जडल्या सुबद्धु फळशो ॥६५॥

वेदें प्रवृत्तिरोचनेकारणें । स्वर्गाचि नाना फलें बोलणें ।

त्यांलागीं ज्याचें बैसे धरणें । तेणें नागवणें निजस्वार्थां ॥६६॥

कष्टोनि शेतीं पेरिले चणे । त्यांची उपडोनि भाजी करणें ।

तो लाभ कीं तेणें नाडणें । तैसें फळ भोगणें सकार्मीं ॥६७॥

वोलीं जोंधळियाचीं करबाडें । खातां अत्यंत लागतीं गोडें ।

त्यालागीं शेत जैं उपडे । तैं लाभु कीं नाडे निजस्वार्था ॥६८॥

तैशी सकामकामनाउन्मत्तें । जें फळीं फळाशालोलिंगतें ।

ते नाडलीं स्वधर्मलाभातें । ऐक तूतें सांगेन ॥६९॥

शेतीं पेरावया आणिले चणे । त्यांचे आदरें करी जो फुटाणे ।

तो शाहणा कीं मूर्ख म्हणणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥२७०॥

घोडा विकोनि पलाण घेणें । लोणी देऊनि ताक मागणें ।

भात सांडूनि वेळण पिणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥७१॥

ऐसे सकाम अतिदुर्बुद्धी । जे नाडले स्वधर्मसिद्धी ।

यालागीं देवो म्हणे `कुबुद्धी' । ते कुबुद्धीची विधी हरि सांगे ॥७२॥