श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

किं विधत्ते किमाचष्टे किमनूद्य विकल्पयेत् ।

इत्यस्या हृदयं लोके नान्यो मद्वेद कश्चन ॥४२॥

कर्मकांडविधिनिषेधीं । कोण अर्थ त्यागार्थ निंदी ।

कोण तो अर्थ प्रतिपादी । स्वहितबुद्धी साधकां ॥५४॥

मंत्रकांडें मंत्रमूर्ती । सांगोपांग सायुधस्थिती ।

उपासना-उपास्ययुक्ती । किमर्थ भक्ती करविली ॥५५॥

ज्ञानकांड त्रिशुद्धी । कोण पदार्थ निषेधी ।

कोण्या अर्थातें प्रतिपादी । निजबुद्धी बोधुनी ॥५६॥

एवं वेदाचें अचळ मूळ । विधिविधानेसीं मुख्य फळ ।

जाणावया गा केवळ । नाहीं ज्ञानबळ सुरनरां ॥५७॥

या वेदार्थातें तत्त्वतां । मीचि एक सर्वज्ञ ज्ञाता ।

माझे कृपेवीण सर्वथा । हें न येचि हाता ब्रह्मादिकां ॥५८॥

तेथ उद्धवाचें मनोगत । देवो जाणे वेदींचा इत्यर्थ ।

तरी भक्तकृपाळू श्रीकृष्णनाथ । मजही तो अर्थ दयेनें सांगों ॥५९॥

हा उद्धवाचा निजभावो । जाणों सरला देवाधिदेवो ।

तो वेदार्थाचा अभिप्रावो । श्लोकान्वयो पहा हो सांगत ॥४६०॥