श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ८ वा

एकस्मिन्नपि दृश्यन्ते, प्रविष्टनीतराणि च ।

पूर्वस्मिन्वा परस्मिन्वा, तत्त्वे तत्त्वानि सर्वशः ॥८॥

आकाशापासूनि वायु झाला । तो गगनावेगळा नाहीं गेला ।

वायूपासूनि अग्नि झाला । तेथ प्रवेशु आला दोंहीचा ॥८०॥

अग्नीपासून आला जळरस । त्यामाजीं तिंहीचा रहिवास ।

जळापासून पृथ्वीचा प्रकाश । तीमाजीं प्रवेश चहूंचा ॥८१॥

तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ।

जेवीं लेणें आणि सुवर्ण । वेगळेंपण एकत्वें ॥८२॥

जेवीं तंतु आणि पट । दोनी दिसती एकवट ।

तेवीं कार्यकारण सगट । दिसे स्पष्ट अभिन्न ॥८३॥

साकरेचीं नारळें केळीं । परी तीं साकरत्वा नाहीं मुकलीं ।

तेवीं कारणांचीं कार्यें झालीं । असतां संचलीं कारणत्वें ॥८४॥

जेवीं कां पृथ्वीचा मृत्पिंड । मृत्पिंडीं अनेक भांड ।

होतां गाडगीं उदंड । मृत्तिका अखंड सर्वांमाजीं ॥८५॥

तेवीं कारणीं कार्यविशेषु । कार्यासी कारणत्वें प्रकाशु ।

हा परस्परानुप्रवेशु । अनन्य बिलासु अखंडत्वें ॥८६॥

एक कार्य आणि कारण । होय भिन्न आणि अभिन्न ।

तेणें तत्त्वसंख्यालक्षण । घडे जाण न्यूनाधिक ॥८७॥