श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ११ वा

पुरुषेश्वरयोरत्र, न वैलक्षण्यमण्वपि ।

तदन्यकल्पनाऽपार्था, ज्ञानं च प्रकृतेर्गुणः ॥११॥

जीवेश्वरांची ऐक्यता । सहजचि असे स्वभावतां ।

तेथ अणुमात्र भेदवार्ता । न रिघे सर्वथा निश्चित ॥१२॥

स्वभावें पाहतां दर्पण । एकाचें देखिजे दोन्हीपण ।

परी द्विधा नव्हेचि आपण । यापरी जाण जीवशिव ॥१३॥

अज्ञानप्रतिबिंब तें जीव । त्याचा द्रष्टा तो सदाशिव ।

तरी ऐक्यतेचें जें वैभव । तो निजस्वभाव मोडेना ॥१४॥

जेवीं दर्पणामाजीं आपण । तेवीं जीवरुपें शिवुचि जाण ।

दोनी चेतनत्वें समान । तेंही लक्षण अवधारीं ॥१५॥

जैशी चेष्टा कीजे आपण । तेचि प्रतिबिंबीं दिसे जाण ।

तेवीं ईश्वरसत्ता सचेतन । गमनागमन जीवासी ॥१६॥

जेणें स्वरुपें असे आपण । तद्रूप प्रतिबिंबीं दिसे जाण ।

तेवीं ईश्वरत्व संपूर्ण । असे अविच्छिन्न जीवामाजीं ॥१७॥

जैसा अग्नि राखां झांकोळिला । तरी अग्नि अग्निपणें असे संचला ।

तेवीं शिवासी जीवभावो आला । परी नाहीं मुकला निजत्वा ॥१८॥

आशंका ॥ "हो कां जीव शिव दोनी एक । तरी एक मलिन एक चोख ।

तैसे सदोख आणि निर्दोख । हे विशेख कां दिसती" ॥१९॥

थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । त्या प्रतिबिंबाअंगीं सर्वथा ।

थिल्लरींचे मळ पाहतां । दिसती तत्त्वतां लागलेसे ॥१२०॥

तेचि निर्वाळूनि पाहतां वेगीं । बिंबप्रतिबिंबनियोगीं ।

सर्वथा मळ न लगे अंगीं । उभयभागीं विशुद्ध ॥२१॥

आरशाअंगीं टिकले मळ । सुबद्ध बैसले बहुकाळ ।

ते प्रतिबिंबाअंगीं केवळ । दिसती प्रबळ जडलेसे ॥२२॥

तो मळ जैं पडे फेडावा । तैं आरिसा साहणे तोडावा ।

परी प्रतिबिंब केव्हां । साहणे धरावा हें बोलूं नये ॥२३॥

तेवीं सदोष आणि निर्दोष । केवळ अविद्याचि हे देख ।

जीव शिव उभयतां चोख । नित्य निर्दोख निजरुपें ॥२४॥

पाहतां शुद्धत्वें स्फटिक जैसा । जे रंगीं ठेवावा दिसे त्याऐसा ।

स्वयें अलिप्त जैसातैसा । जीव स्वभावतां तैसाचि ॥२५॥

जीव स्वयें चित्स्वरुप । जे गुणीं मिळे दिसे तद्रूप ।

परी गुणदोष पुण्यपाप । जीवासी अल्प लागेना ॥२६॥

प्रत्यक्ष प्रतिबिंबीं मिथ्यता । दिसे निजबिंबाचिया सत्ता ।

तेवीं जीवशिवांसी अभिन्नता । जाण तत्त्वतां निश्चित ॥२७॥

जीवशिवांचें एकमण । तेणें सव्विसांमाजीं जाण ।

एक तत्त्व होतां न्यून । शेष तेंचि पूर्ण पंचवीस ॥२८॥

आशंका ॥ "जीवशिवांचें एकपण । ऐसें जें जाणणें तें ’ज्ञान’ ।

तें एक तत्त्व येथें आन । त्यांमाजीं जाण उपजलें ॥२९॥

तें ज्ञानतत्त्व अंगीकारितां । पंचवीस सव्वीस तत्त्वकथा ।

दोनी मतें होती वृथा " । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥१३०॥

येथ मूळींचें निरुपण । श्लोकाचे अंतींचा चरण ।

ज्ञान तें प्रकृतीचा गुण । त्यासी वेगळेपण असेना ॥३१॥

गुण कर्मांच्या खटपटा । प्रपंच अज्ञानें अतिलाठा ।

ज्ञान अज्ञानाचा सत्त्ववांटा । जेवीं कांटेनि कांटा फेडिजे ॥३२॥

शोधित जो सत्त्वगुण । त्या नांव बोलिजे मुख्य ’ज्ञान’ ।

तेंही गुणांमाजीं पडे जाण । वेगळेंपण नव्हेचि तत्त्व ॥३३॥

ज्ञान स्वतंत्र तत्त्व होतें । तरी नासतीं दोनी मतें ।

तें पडे गुणाआंतौतें । यालागीं दोनी मतें निर्दुष्ट ॥३४॥

तेचि त्रिगुणांची व्यवस्था । तुज मी सांगेन आतां ।

ऐक उद्धवा तत्त्वतां । गुण सर्वथा आविद्यक ॥३५॥