श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १६ वा

शब्दः स्पर्शो रसो गन्धो, रुपं चेत्यर्थजातयः ।

गत्युक्‍त्युत्सर्गाशिल्पानि, कर्मायतनसिद्धयः ॥१६॥

रसस्पर्शादि लक्षण । पांचही विषय हे जाण ।

गत्यादि क्रियाचरण । तें जाण साधन या विषयांचें ॥५३॥

दृष्टि रुपातें प्रकाशी । चरण धांवती तयापाशीं ।

हस्त उद्यत घ्यावयासी । रसस्पर्शसिद्धीसी विषयांचे ॥५४॥

एवं उभय इंद्रियीं जाण । विषय पांचचि प्रमाण ।

नव्हे अधिक तत्त्व गणन । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥५५॥

नव एकादश तत्त्वलक्षण । मागां दों श्लोकीं केलें निरुपण ।

येणें श्लोकें परम प्रमाण । विषय जाण पांचचि ॥५६॥

केवळ ज्ञानेंद्रियीं भोगु नव्हे । कर्मेंद्रियींही भोग न फावे ।

उभयसंयोगें भोग पावे । परी विषय आघवे पांचचि ॥५७॥

इंहीं पांच विषयीं आपण । व्यापिलें चतुर्दश भुवन ।

सुरासुर भुलविले जाण । यांचें गोडपण मारक ॥५८॥

जेवीं कां मैंद गोडपणें । संगतीं लागोनि जीव घेणें ।

तेवीं विषयसंगाचें साजणें । बांधोनि नेणें नरकासी ॥५९॥

नरकीं निरय भोगिती । तेथही न सोडी विषयासक्ती ।

या विषयांऐसा विश्वासघाती । आन त्रिजगतीं असेना ॥१६०॥

ते हे पंच विषय प्रमाण । पांचचि परी अतिदारुण ।

ब्रह्मादिक नाडले जाण । इतरांच कोण पडिपाडु ॥६१॥

विषयांचें जें गोडपण । तें विखाहूनि दारुण ।

विष एकदां आणी मरण । पुनः पुनः मारण विषयांचें ॥६२॥

पुढती जन्म पुढती मरण । हें विषयास्तव घडे जाण ।

संसाराचें सबळपण । विषयाधीन उद्धवा ॥६३॥

जेथ विषयांचा विषयत्यागु । तेथें उन्मळे भवरोगु ।

त्याचा आंदणा मी श्रीरंगु । ज्यासी विषयभोगु नावडे ॥६४॥

ते हे पंच विषय गा जाण । तुज म्यां केले निरुपण ।;

आतां त्रिगुणांचें लक्षण । ऐक सावधान सांगतों ॥६५॥

उत्पत्तिस्थितिनिर्दळण । त्रिगुणांस्तव घडे जाण ।

यालागीं स्वयें श्रीकृष्ण । तिन्ही गुण अंगीकारी ॥६६॥

अंगीकारुनि तिन्ही गुण । अठ्ठावीस तत्त्वें केलीं पूर्ण ।

हें कृष्णसंमत लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥६७॥

त्रिगुणगुणेंवीण प्रकृती । सृष्टिसर्जनीं नाहीं शक्ती ।

गुणद्वारा उत्पत्तिस्थिती । संहारी अंतीं स्वकार्यें ॥६८॥

तेचि अर्थीचें निरुपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।

कार्यकारणलक्षण । यथार्थ जाण विभाग ॥६९॥