श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २७ वा

एवं मे पुण्डरीकाक्ष महान्तं संशयं हृदि ।

छेत्तुमर्हसि सर्वज्ञ वचोभिर्नयनैपुणैः ॥२७॥

कमलनाभा कमलानना । कमलालया कमलधारणा ।

कमलिनीवासस्थाना । कमलनयना श्रीकृष्णा ॥५४॥

प्रकृतिपुरुषयोग अवघड । योग्यां न कळे भिन्न निवाड ।

या संशयाचें अतिजाड । हृदयीं झाड वाढलें ॥५५॥

हृदयीं संदेहाचीं मूळें । प्रकृतिभूमीं विकल्पजळें ।

संशयवृक्ष तेणें बळें । वाढला अहंफळें सदा फळित ॥५६॥

ज्या वृक्षाचीं सदा फळें खातां । जीव न राहे सर्वथा ।

तेणें संशयाची अधिकता । उसंतू चित्ता पैं नाहीं ॥५७॥

ऐशिया वृक्षाचें छेदन । कृपेनें करावें आपण ।

सोडूनि ज्ञानतिखवाग्बाण । करीं निर्दळण निजांगें ॥५८॥

योगयागशास्त्रपाठें । करितां धर्मकर्मकचाटें ।

या वृक्षाचें पानही न तुटे । हें कठिणत्व मोठें गोविंदा ॥५९॥

या वृक्षाचें करितां छेदन । ब्रह्मा झाला संदेहापन्न ।

तुवां हंसगीत सांगोन । उद्धरिला जाण सुपुत्र ॥२६०॥

मुख्य ब्रह्म्याची ऐशी अवस्था । तेथ इतरांची कोण कथा ।

या वृक्षाचा छेदिता । तुजवीण सर्वथा आन नाहीं ॥६१॥

छेद करितां वरिवरी । वासना मुळ्या उरल्या उरी ।

फांफाईल चौगुण्यापरी । अतिशयें भारी बांबळे ॥६२॥

याचा समूळ मूळेंसीं कंदू । छेदिता छेदक तूं गोविंदू ।

तुजवेगळा संशयच्छेदू । भलता प्रबुद्धू करुं न शके ॥६३॥

म्हणशी संशय हृदयाच्या ठायीं । तेथ शस्त्रांचा रिगमू नाहीं ।

म्यां छेदावें कैसें कायी । ते अर्थीचे मी पाहीं सांगेन ॥६४॥

तुझें ज्ञानचक्र अलोलिक । तुझेनि शब्दतेजें अतितिख ।

समूळ संशयाचें छेदक । तुझें वचन एक गोविंदा ॥६५॥

ऐसें तुझें ज्ञानवचन । तुवां केलिया कृपावलोकन ।

समूळ संशयाचें निर्दळण । सहजेंचि जाण होताहे ॥६६॥

तरी तुवां श्रीमुकुंदा । फेडावी माझी संशयबाधा ।

तया उद्धवाचिया शब्दा । गोपीराद्धा सांगेन म्हणे ॥६७॥

असतां बहुसाल सज्ञान । सकळ संशयांचें निर्दळण ।

मीचि कर्ता हें काय कारण । तेंही लक्षण अवधारीं ॥६८॥;