श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३१ वा

दृग्रूपमार्कं वपुरत्र रन्ध्रे परस्परं सिध्यति यः स्वतः खे ।

आत्मा यदेषामपरो य आद्यः स्वयाऽनुभूत्याऽखिलसिद्धसिद्धिः ॥३१॥

चक्षु इंद्रिय यंत्र थोर । तेथ कामिनीरुपाचा महामार ।

घायें भेदिती जिव्हार । पडले सुरनर कोट्यनुकोटी ॥१५॥

चक्षुगोल इंद्रिय शरीरीं । तेथ अधिदेव सूर्य अधिष्ठात्री ।

देखिल्या रुपाची धारणा धरी । तेंचि निजनिर्धारीं अध्यात्म ॥१६॥

नीलपीतरुपाभरण । दृष्टीं देखिजे दर्शन ।

तेंचि अधिभूत सत्य जाण । दृश्याचें भान दृष्टीसी ॥१७॥

सूर्य अधिदैव सिद्ध आहे । अधिभूत दृष्टी भरलें पाहें ।

शरीरीं चक्षुगोळही होये । परी अध्यात्मतेजेंवीण राहे अंधत्व ॥१८॥

अधिदैव अधिभूत असतां पाहीं । अध्यात्म तेज जंव दृष्टीसी नाहीं ।

तंव देखणें न घडे कांहीं । अंधत्व ते ठायीं ठसावोनि ठाके ॥१९॥

अध्यात्म अधिभूत दोनी आहे । जैं अधिदैव सूर्य अस्ता जाये ।

तैं दृष्टीचें देखणें ठाये । स्तब्धत्वें राहे तमामाजीं ॥३२०॥

ते काळीं दृष्टीसी पाहें । स्नेहसूत्र मेळवून लाहे ।

अग्नि जरी केला साह्ये । तरी प्रकाशू नोहे रवीऐसा ॥२१॥

तेथ चंद्रोदयो जरी जाहला । तो सूर्यसमान नाहीं आला ।

निशा निरसूनि दृष्टीं साह्य जाहला । यालागीं सूर्य बोलिला अधिदैव ॥२२॥

अध्यात्म अधिभूत असतां पाहीं । अधिदैव सूर्य जेथ नाहीं ।

तेथ दृष्टीचें न चले काहीं । तुज म्यां तेंही सांगीतलें ॥२३॥

अध्यात्म अधिदैव दोनी आहे । अधिभूतें दृश्यदर्शन राहे ।

तैं सत्य ब्रह्मज्ञान होये । जैं गुरुकृपा पाहे पूर्णांशें ॥२४॥

येथ जें दृश्याचें दर्शन । तेणें देहबुद्धि दृढ जाण ।

तें दृश्याचें पुशिल्या भान । होय देहेंशीं शून्य संसार ॥२५॥

अधिदैव अध्यात्म अधिभूत । त्रिपुटी बोलिजे हे येथ ।

तुज म्यां सांगीतली साद्यंत । जाण निश्चित विभाग ॥२६॥;

येथूनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।

कर्म कर्ता क्रियाचरण । ध्येय ध्यान ध्यातृत्व ॥२७॥

त्रिपुटी म्हणावयाचें कारण । परस्परें सापेक्षपण ।

तें अपेक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥२८॥

नानाकारें अतिविलास । येथ देखणी दृष्टी डोळस ।

तेही सूर्येंवीण वोस । हा अनुप्रवेश परस्परें ॥२९॥

सूर्य आहे डोळा नाहीं । तेथ पाहणें न चले पाहीं ।

हो कां डोळा आहे सूर्य नाहीं । तेथें दृष्टीचें कांहीं चालेना ॥३३०॥

सूर्य आणि दृष्टी दोनी आहे । परी दृश्य जैं नाहीं होये ।

तैं दोहींचें सामर्थ्य राहे । देखावें काये दृष्टीनें ॥३१॥

सूर्य प्रकाशी रुपासी । दृष्टीसी रिघोनियां स्वांशेंसीं ।

दाखवी नाना आकारांसी । परस्परानुप्रवेशीं बोलिजे सिद्धी ॥३२॥;

इतुकें करोनियां सविता । नभोमंडळीं अलिप्तता ।

तेवीं जगदाकारें चेतविता । अलिप्त तत्त्वतां चिदात्मा ॥३३॥

जो जगामाजीं भरला राहे । जगाचा हृदयस्थही होये ।

जग जरी होये जाये । परी तो आहे जैसातैसा ॥३४॥

जेवीं आकाशअभ्यंतरीं । होतां घटाकाश सहस्त्रवरी ।

आकाश त्या घटाभीतरीं । प्रत्यक्षाकारीं भरलें दिसे ॥३५॥

ते घटचि होती जाती । परी आकाश सहजस्थिती ।

तेवीं उत्पत्तिस्थितिअंतीं । अलिप्त श्रीपती चिदात्मा ॥३६॥

तो आदीची अनादि आदि । तो बुद्धीची अनादि बुद्धी ।

तो सिद्धीची अनादि सिद्धी । जाण त्रिशुद्धी परमात्मा ॥३७॥

हा प्रकाशा प्रकाशक । अर्काचाही आदि अर्क ।

स्वयें त्रिपुटीचा द्योतक । अलिप्त एक परमात्मा ॥३८॥

हा विवेकाचाही विवेक । हा सुखाचा सुखदायक ।

बुद्धीचा जो बोधक । प्रकाशा प्रकाशक परमात्मा ॥३९॥

त्यासी जाणों जातां जाणपणें । वेदांसी जाहलें लाजिरवाणें ।

वेडावलीं स्मृतिपुराणें । न कळे शास्त्रपठणें भांडतां ॥३४०॥

देवो देवी आणि देवता । भोग्य भोग आणि भोक्ता ।

नाना त्रिपुटींची त्रिगुणता । जाण सर्वथा प्रकृतीचि हे ॥४१॥

हा आद्य अव्यक्त अतर्क्य । प्रकृतिपर परमात्मा एक ।

यासी जाणावया विवेक । न चले देख आणिकांचा ॥४२॥

याचेनि हा हृदयीं देखिजे । याचेनि हा इत्यंभूत जाणिजे ।

यातें धरोनि हा पाविजे । हेंही लाहिजे कृपें याचेनी ॥४३॥

हा स्वप्रकाश सहज निजें । यासी प्रकाशी ऐसें नाहीं दुजें ।

याचेनि प्रकाशें हा देखिजे । याचेनि होइजे याऐसें ॥४४॥

अधिदैव अध्यात्म अधिभूत । नेत्रद्वारा सांगितलें तेथ ।

तैसेंच अन्य इंद्रियीं व्यावृत्त । देव सांगत संकलितें ॥४५॥;

एवं त्वगादि श्रवणादि चक्षुर्जिह्वादि नासादि च चित्तयुक्तम्‌ ॥३१॥

योऽसौ गुणक्षोभकृतो विकारः प्रधानमूलान्महतः प्रसूतः ॥

प्रधानापासाव महदादिद्वारा । नाना विकारांचा पसारा ।

गुणक्षोभें क्षोभूनि पुरा । उठिला उभारा त्रिपुटीरुपें ॥४६॥

जेवीं सूर्यें चक्षुरादि विंदान । तैसेंचि श्रोत्र त्वचा रसना घ्राण ।

हें ज्ञानेंद्रियपंचक जाण । याचें कर्म समान त्रिपुटीरुपें ॥४७॥

येथ कर्मेंद्रियें पांच आन । तीं ज्ञानेंद्रियां अधीन ।

हस्त पाद गुद शिश्न । वाचा जाण पांचवी ॥४८॥

त्यांसी ज्ञानेंद्रियें प्रेरिती । तैं कर्मेंद्रियें कर्मीं वर्तती ।

एवं उभयपंचकस्थिती । जाण निश्चितीं दशेंद्रियें ॥४९॥

चित्तचतुष्टयचमत्कार । मन बुद्धि चित्त अहंकार ।

हीं एकचि परी भिन्न प्रकार । जैसा व्यापार तैसें नांव ॥३५०॥

केवळ देहाकारें मीपण । तो सबळ अहंकार जाण ।

संकल्पविकल्प जे गहन । तेंचि मन उद्धवा ॥५१॥

गतभोगाचें जें चिंतन । तें चित्ताचें लक्षण ।

केवळ निश्चयात्मक जाण । बुद्धि संपूर्ण ती नांव ॥५२॥

हें गुणक्षोभाचें लक्षण । भोगसाधनें भोग्य जाण ।

त्याहूनि भोक्ता तो भिन्न । तेंही उपलक्षण अवधारीं ॥५३॥

त्वगिंद्रियीं विषयस्पर्शन । तेथें अधिदैव वायू जाण ।

त्याहूनि परमात्मा भिन्न । चित्स्वरुपें जाण अविकारी ॥५४॥

गंधविषयो घाणेंद्रियें । तेथ अधिदैव अश्विनौदेव होये ।

आत्मा त्याहूनि वेगळा पाहें । चित्स्वरुपें राहे अविकारी ॥५५॥

रसनेंद्रिय अतिगहन । रसविषयो तेथील जाण ।

वरुण अधिदैवत आपण । आत्मा स्वानंदपूर्ण रसातीत ॥५६॥

श्रवणेंद्रियीं विषयो शब्द । तेथ दिशा अधिदैव प्रसिद्ध ।

शब्दीं निजात्मा निःशब्द । चिदत्वें शुद्ध अविकारी ॥५७॥

चक्षुरिंद्रियलक्षण । पूर्वीं निरुपिलें जाण ।

हें ज्ञानेंद्रियविंदान । त्रिपुटी संपूर्ण ऐशा रीतीं ॥५८॥

चित्त इंद्रिय जें कां येथ । चिंतन विषयो त्यासी प्राप्त ।

वासुदेव अधिदैवत । आत्मा अलिप्त चित्तेंसीं ॥५९॥

मनेंद्रिय अतिचपळ । संकल्प विषयो त्याचा प्रबळ ।

तेथ अधिदैव चंद्र निर्मळ । आत्मा केवळ मनातीत ॥३६०॥

अहंकार इंद्रिय कठिण । तेथील विषयो मीपण ।

रुद्र अधिदैवत जाण । परमात्मा भिन्न अहंकारेंसीं ॥६१॥

बुद्धींद्रिय अतिसज्ञान । बोद्धव्य तेथींचा विषयो जाण ।

ब्रह्मा अधिदैवत आपण । आत्मा चिद्धन बुद्धयतीत ॥६२॥;

चित्तचतुष्टय सकारण । त्रिपुटी सांगितली हे संपूर्ण जाण ।

आतां कर्मेंद्रियांचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥६३॥

वागिंद्रियीं वाच्य विषयो । अग्नि अधिदैवत तेथील पहा हो ।

तेथ सरस्वतीशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो महामौनें ॥६४॥

पाणींद्रियीं ग्रहण विषयो । इंद्र अधिदैवत तेथील पहा हो ।

तेथ क्रियाशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो अक्रियत्वें ॥६५॥

पादेंद्रियीं गति विषयो । तेथें उपेंद्र अधिदैवो ।

तेथें गमनशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो निश्चलत्वें ॥६६॥

गुदेंद्रियीं विसर्ग विषयो । निऋति आधिदैवत तेथील पहा हो ।

क्षरशक्तीचा तेथ निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो अक्षरत्वें ॥६७॥

शिश्नेंद्रियीं रति विषयो । प्रजापति तेथें अधिदैवो ।

आनंदशक्तीचा तेथें निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो परमानंदें ॥६८॥

ज्ञानकर्मेंद्रियें कर्माचरण । चित्तचतुष्टयाचें लक्षण ।

हें गुणक्षोभाचें कारण । समूळ जाण मायिक ॥६९॥

तेंचि गुणक्षोभाचें प्रधान मूळ । प्रकृतिविकारें होय स्थूळ ।

आत्मा अविकारी निर्मळ । अलिप्त केवळ प्रकृतीसी ॥३७०॥

जेवीं वृत्तिभूमीसमवेत । गृहीं गृहसामग्री समस्त ।

अभिमानें उपार्जी गृहस्थ । परी तो त्याअतीत आपण जैसा ॥७१॥

तेवीं त्रिगुणक्षोभें अभिमान । वाढवी नाना विकारवन ।

आत्मा वसंत तो भिन्न । तेंचि निरुपण हरि बोले ॥७२॥;