श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४४ वा

सोऽयं दीपोऽर्चिषां यद्वत् स्त्रोतसां तदिदं जलम् ।

सोऽयं पुमानिति नृणां मृषा गीर्धीर्मृषायुषाम् ॥४४॥

दीपज्वाळा होती जाती । अग्नि जैसा पूर्वस्थिती ।

यालागीं तोचि दीपू म्हणती । ऐशा युक्ती उद्धवा ॥९१॥

प्रवाह वाहती कल्लोळ । परी अखंड एकचि जळ ।

यालागीं म्हणती सकळ । तेंचि जळ या हेतू ॥९२॥

तेवीं देहीं वयसा होती जाती । आत्मा अखंड अनुस्यूती ।

तोचि मी हे स्फुरे स्फूर्ती । या उपपत्ती उद्धवा ॥९३॥

म्हणसी मीपणें अहंकार रुढ । तोही अज्ञानत्वें जडमूढ ।

त्यासी प्रकाशक आत्मा दृढ । मीपणें अखंड वस्तुत्वें स्फुरे ॥९४॥

येथ देहासीचि जन्ममरण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण ।

येथ देहात्मबुद्धीचें जें मीपण । ते वाचा जाण अतिमिथ्या ॥९५॥

विषयांची विषयसिद्धी । देहीं जे कांहीं देहबुद्धी ।

तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी । भवबंधीं स्थापक ॥९६॥

कर्मभूमीं नरदेहाऐसें । निधान लाधलें अनायासें ।

तेथींचेनिही आयुष्यें । जे विषयविलासें विगुंतले ॥९७॥

तो अमृत विकूनि कांजी प्याला । रत्‍नें देऊनि कोंडा घेतला ।

पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥९८॥

डोळे फोडोनि काजळ ल्याला । नाक कापूनि शिमगा खेळला ।

तैसा नरदेहा नाडला । नाश केला आयुष्याचा ॥९९॥

वेंचितां धन लक्षकोटी । आयुष्यक्षणाची नव्हे भेटी ।

तेंही वेंचिलें विषयासाठीं । हतायु करंटीं अतिमूढें ॥५००॥

मुख्य देहोचि काल्पनिक जाण । तेथील काल्पनिक अभिमान ।

तें हें देहबुद्धीचें मीपण । लावी दृढ बंधन जगासी ॥१॥

तें सांडितां देहाचें मीपण । कैंचें जन्म कैंचें मरण ।

तेव्हां संसारुचि नाहीं जाण । भवबंधन मग कैंचें ॥२॥

जैसा मिथ्या बागुलाचा भेवो । बाळक सत्य मानिला पहा हो ।

तैसा मृषा काल्पनिक देहो । सत्यत्वें पहा हो मानिला ॥३॥

मिथ्या देहो आणि देहबुद्धी । त्यासी पुढें कैसी जन्मसिद्धी ।

मिथ्याभूतासी नव्हे वृद्धी । तेविखींची विधि हरि बोले ॥४॥;