श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४७ वा

एका मनोरथमयीर्ह्यन्यस्योच्चावचास्तनूः ।

गुणसङगादुपादत्ते क्वचित्कश्चिज्जहाति च ॥४७॥

संसारविकाराचें भान । अभिमानयुक्त करी मन ।

स्वर्गनरक गमनागमन । देहाभिमान भोगवी ॥४९॥;

आत्मा याहूनि सहजें भिन्न । चिन्मात्रैक चिद्धन ।

तेथ आतळों न शके मन । शुद्धीं अभिमान असेना ॥५५०॥

मन अभिमान प्रसवे माया । अभिमानें गुण आणिले आया ।

गुणीं मायिक केली काया । विकारसामग्रियासमवेत ॥५१॥

जैशी देहापाशीं छाया । तैशी स्वरुपीं मिथ्या माया ।

जेथ जन्ममरणेंसीं काया । रिघावया ठावो नाहीं ॥५२॥

आत्मा शुद्ध काया मलिन । काया जड आत्मा चिद्धन ।

अज अव्यय आत्मा परिपूर्ण । जन्ममरण देहासी ॥५३॥

तिनी गुण तिनी अवस्था । कार्य कर्म अहंकर्ता ।

हें देहाभिमानाचे माथां । आत्मा सर्वथा अलिप्त ॥५४॥

यापरी विकारांहून । आत्मा चिद्रूपें सहज भिन्न ।

म्हणशी जीवास देहाभिमान । तेंही कथन अवधारीं ॥५५॥

जीव अलिप्त मायागुणीं । ऐक सांगेन ते काहाणी ।

स्फटिक ठेविजे जैशा वर्णीं । तद्रूपपणीं तो भासे ॥५६॥

हो कां तद्रूपपणेंही दिसतां । स्फटिक अलिप्त निजशुद्धता ।

तेवीं सत्त्वादि गुणीं क्रीडतां । जीव तत्त्वतां अलिप्त ॥५७॥

स्फटिक काजळीं दिसे काळा । परी तो काळेपणावेगळा ।

तेवीं तमोगुणें जीवू मैळा । दिसोनि निराळा तमेंसीं ॥५८॥

स्फटिक आरक्तीं आरक्तकिळा । दिसोन आरक्ततेवेगळा ।

तेवीं रजोगुणीं राजसलीळा । भोगूनि वेगळा जीवात्मा ॥५९॥

स्फटिक श्र्वेतवर्णीं दिसे श्र्वेत । परी तो श्र्वेतपणा अलिप्त ।

तेवीं सत्त्वीं दिसे ज्ञानवंत । गुणज्ञानातीत जीवात्मा ॥५६०॥

त्रिगुण गुणेंसीं अलिप्तता । दाविली जीवशिवांची तत्त्वतां ।

देहीं असोनि निःसंगता । ऐक आतां सांगेन ॥६१॥

जेवीं घटामाजील जीवन । घटीं चंद्रबिंब आणी जाण ।

तेवीं शुद्धासी जीवपण । देहाभिमान देहीं देखे ॥६२॥

घटनिश्चळत्वें बिंब निश्चळ । घटचंचलत्वें तें चंचळ ।

तेवीं देहाच्या अवस्था सकळ । मानी केवळ जीवात्मा ॥६३॥

घटीं कालविल्या अंजन । तरी तें काळें होय जीवन ।

परी बिंबप्रतिबिंबां जाण । काळेपण लागेना ॥६४॥

तेवीं देहाची सुखदुःखकथा । कां पापपुण्यादि जे वार्ता ।

नाहीं जीवशिवांच्या माथां । देह अहंता ते भोगी ॥६५॥

ये घटींचें जळ ते घटीं भरित । चंद्रबिंब असे त्याहीआंत ।

तेवीं या देहींचा त्या देहीं जात । जीवात्मा म्हणत या हेतू ॥६६॥

चंद्र गगनीं अलिप्त असे । तो मिथ्या प्रतिबिंबें घटीं भासे ।

तेवीं वस्तु वस्तुत्वें सावकाशें । जीवू हें पिसें देहात्मा ॥६७॥

त्रिगुणगुणीं गुणातीत । देही देहसंगा अलिप्त ।

जीव शिव दोनी येथ । तुज म्यां साद्यंत दाखविले ॥६८॥;

हें नेणोनियां समस्त । देहात्मवादें जाहले भ्रांत ।

स्वर्गनरकादि आवर्त । योनी भोगवीत अभिमान ॥६९॥

द्विजदेह आरंभूनि येथ । परमेष्ठिदेहपर्यंत ।

स्वर्गसुख देहें समस्त । भोगवी निश्चित पुण्याभिमान ॥५७०॥

याहूनियां अधोमुख येथ । द्विजत्वाहूनि खालते जात ।

नाना दुःखयोनी भोगवित । जाण निश्चित पापाभिमान ॥७१॥

येथ पापपुण्यकर्माचरण । तें वाढविताहे जन्ममरण ।

यांत विरळा सभाग्य जाण । जन्ममरणच्छेदक ॥७२॥;

ज्यांसी निष्काम पुण्याचिया कोडी । जिंहीं स्वधर्म जोडिला जोडी ।

ज्यांसी भूतदया गाढी । ज्यांची आवडी द्विजभजनीं ॥७३॥

जे अहिंसेसी अधिवास । ज्यांचें अद्वैतपर मानस ।

जे सारासारराजहंस । जन्ममरणांचा त्रास घेतला जिंहीं ॥७४॥

जे उपनिशदर्थचातक । जे जीवजनकाचे शोधक ।

जे निजात्मतत्त्वसाधक । जे विश्वासुक भावार्थी ॥७५॥

ज्यांसी संतचरणीं सद्भावो । जे गुरुवचनीं विकले पहा हो ।

त्यांसी देहीं विदेहभावो । मत्कृपें पहा हो पावती ॥७६॥

तेही निजबोधें देहाची बेडी । तोडूनि जन्ममरणाची कोडी ।

उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥

त्यांसी संसाराचे आवर्त । सर्वथा गेले न लगत ।

जेवीं बुडण्याचा संकेत । मृगजळाआंत असेना ॥७८॥

ऐसे प्राप्तपुरुष येथ । संसारीं नाहींत गा बहुत ।

हिंडतां अवघ्या जगांत । एकादा कदाचित देखिजे ॥७९॥

असो देखिल्याही त्यातें । कोण आहे ओळखतें ।

उद्धवा जाण निश्चितें । आत्मा येथें दिसेना ॥५८०॥

जरी निकट भेटला ज्ञाता । त्याचा देह देखिजे वर्ततां ।

परी भीतरील निजात्मता । न दिसे सर्वथा कोणासी ॥८१॥

आत्मा गेला आला म्हणती । शेखीं येणेंजाणें न देखती ।

तेच विषयींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥८२॥